Saturday, July 5, 2025

अनिल परबांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणार?

अनिल परबांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणार?

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणखी आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील मुरूड येथील रिसॉर्टवर हातोडा पडणार असल्याचे सूचक ट्वीट किरीट सोमय्या यांनी केले आहे. रिसॉर्टच्या बांधकामप्रकरणी पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरवठा सुरू असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.


दापोली येथील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून परब यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्याशिवाय, हे रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैसा वापरला असल्याचा आरोप त्यांनी केला होता.


https://twitter.com/KiritSomaiya/status/1559358559535628289

किरीट सोमय्या यांनी आज सकाळी ट्वीट करून अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट येत्या दोन ते चार दिवसात पाडण्याचा अंतिम आदेश अपेक्षित असल्याचे सोमय्यांनी सांगितले.


दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांची ईडीने चौकशीदेखील केली होती. ईडीने परब यांच्या शासकीय आणि खासगी निवासस्थानीदेखील छापा मारला होता. त्यावेळी शिवसेनेने ही राजकीय सूडाने केलेली कारवाई असल्याचे म्हटले होते.


याआधी पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी ३१ जानेवारी २०२२ रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. ९० दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, ९० दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे.

Comments
Add Comment