नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज चौथी पुण्यतिथी आहे. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी त्यांच्या समाधी स्थळ ‘सदैव अटल’ येथे जाऊन आदरांजली वाहिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही श्रद्धांजली वाहिली. १६ ऑगस्ट २०१८ रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले.
पंडित नेहरुनंतर सलग दोनदा पंतप्रधान होणारे ते पहिले पंतप्रधान ठरले. ज्येष्ठ संसदपटू असलेले अटल बिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते. वाजपेयी नऊ वेळा लोकसभेवर तर दोन वेळा राज्यसभेवर निवडून आले होते हाही एक प्रकारचा विक्रमच आहे.
एक पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष व एक विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी समर्थपणे भूमिका बजावली. ब्रिटीश सत्तेला भारतातून पायउतार करण्यात महत्वाच्या ठरलेल्या १९४२ मधील भारत छोडो चळवळीमध्ये सहभागी होऊन विद्यार्थीदशेतच वाजपेयी यांनी राष्ट्रवादी राजकारणाचे धडे गिरवले. राज्यशास्त्र व कायद्याचे विद्यार्थी असलेल्या वाजपेयींना शालेय काळातच परकीय व्यवहारामध्ये रुची निर्माण झाली होती. त्यांनी ही आवड पुढे अनेक वर्ष जोपासली व विविध द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी या कौशल्याचा उपयोग केला.
२५ डिसेंबर १९२४ साली तत्कालीन ग्वालियर संस्थानातील (आताच्या मध्यप्रदेश राज्यात आहे) एका प्राथमिक शिक्षकाच्या घरात वाजपेयी यांचा जन्म झाला. अटल बिहारी वाजपेयी यांचा सामाजिक जीवनातील उदय हा भारतीय लोकशाही व त्यांच्या कुशाग्र राजकीय बुद्धिमत्तेचा गौरव आहे. भारताप्रती असलेले त्यांचे निस्वार्थ समर्पण व पन्नास वर्षाहून अधिक काळ देशासाठी दिलेल्या निस्पृह सेवेबद्दल त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. १९९४ साली उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.