अहमदनगर (प्रतिनिधी) : अपहृत प्रकरणातील मुलीच्या नातेवाईकांविरुध्द लावण्यात आलेली कलमे कमी करण्यासाठी घेतलेली रक्कम बँकेतून काढण्यास भाग पाडल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक व अन्य एका जणाविरूध्द नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील मौजे अंतर्वली येथून प्रकाश जानकू कोकरे यांची अल्पवयीन मुलगी (वय १६) घराशेजारील अलीम राजू शेख या तुरुणाने अपहरण करून पळवून नेल्याचा नेवासा पोलीस स्टेशनात मागील महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. मुलीचे वडील व चुलते पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या तपासा संदर्भात चौकशी करण्यासाठी आले असता, पोलीस निरीक्षकांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून डांबून ठेवले होते.
सदर गुन्ह्यात आरोपीचा तपास करण्याचे सोडून पोलीस निरीक्षकांनी मुलीच्या आजोबांवर कलम दाखल करू, तुमच्या सर्व कुटुंबीयांना सहा महिने जेलमध्ये टाकू, तुमच्या कुटुंबावर गुन्हे दाखल झाले आहेत, असे म्हणत तुमच्यावरील कलम कमी करण्यासाठी सुनील गर्जे रा. मौजे कुकाणा यांना मध्यस्थी करून पो. निरीक्षक बाजीराव पवार यांनी तडजोड रक्कम रुपये रोख स्वरूपात एक लाख पंचवीस हजार रुपये (रु.१,२५,०००) संबंधित सुनील गर्जे यांच्याकडे जमा केली.
पीडित मुलीच्या आजोबांनी सदर रक्कम ही मुलीच्या लग्नासाठी जमवलेली असताना पोलीस अधिकाऱ्याने बँकेतून काढण्यास भाग पाडल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ही बाब कळविल्यानंतर पो. निरीक्षक पवार यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले. या संदर्भात चौकशी करण्याचे वरिष्ठांनी निर्देश दिले. दिलेली रक्कम बाजीराव पवारांनी पीडित तरुणीला परत देखील केली. आज रोजी चौकशीत निष्पन्न झाल्याप्रमाणे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार आणि सुनील गर्जे या दोघांविरुध्द भादंवि ३८४, ३८५, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.