शिबानी जोशी
डॉक्टर हेडगेवार यांची जन्मशताब्दी १९८९ साली संपूर्ण देशभरात साजरी करण्यात आली होती. संपूर्ण देशभरात यानिमित्ताने संघाने संपर्क अभियान राबवलं होतं तसेच संपर्क अभियान चंद्रपूर जिल्ह्यातदेखील संघ कार्यकर्त्यांनी राबवण्यासाठी डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीची स्थापना केली. डॉक्टर हेडगेवार यांची जन्मशताब्दी साजरी करावी यासाठी ही समिती स्थापन झाली आणि त्याच वेळी चंद्रपूर आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये ठोस असे समाजकार्य करावे म्हणून याच समितीच्या माध्यमातून समाजकार्य सुरू ठेवावं असं ठरले. गडचिरोली आणि चंद्रपूर नक्षलग्रस्त जिल्हे आहेत. तिथल्या लोकांच्या अनेक समस्या आजही दिसून येतात. १९८९ साली तर त्या प्रकर्षाने जाणवत होत्या. या लोकांना शिक्षण गरजेचे आहे व आरोग्य सुविधा गरजेचे आहेत, हे लक्षात आल्यावर सुरुवातीला शिक्षण आणि आरोग्य या दोन विषयांवर काम करायचं ठरले. त्या काळात संघाच्या कार्यकर्त्यांना या गावांमध्ये प्रवेश मिळवणे सोपं नव्हते. तरीही सुरुवातीला मुलांच्या शिक्षणासाठी छात्रावास उभारण्याचे ठरवले. या ठिकाणी गरीब मुलांना शिक्षण, निवास, भोजन आणि संस्कार देण्याचं काम सुरू केले. पहिलं छात्रावास एटापल्लीसारख्या नक्षलग्रस्त भागामध्ये सुरू करण्यात आलं. तुमच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळेल तसेच त्यांची राहण्याची ही सोय होईल, असं गावात जाऊन पटवून द्यावं लागलं. हळूहळू ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये गती आहे आणि रुची आहे, अशा विद्यार्थ्यांचे पालक मग संपर्कात येऊ लागले. सातारा व्यास किती लोकप्रिय होती यायचं एक उदाहरण देता येईल.
कोळशी इथे एक छात्रावास सुरू केलं होतं आणि त्याच्या शेजारीच तालुक्याचे शासकीय कार्यालय बांधून तयार झालं होतं आणि त्याचं उद्घाटन २६ जानेवारीला होणार होते. उद्घाटनाच्या आदल्या दिवशीच नक्षलवाद्यांनी ते तहसील कार्यालय उडवून दिले. त्याच्या शेजारीच असलेलं संस्थेचे छात्रावास मात्र टिकून राहील. छात्रावास बांधण्यासाठी दानशूर व्यक्तींनी दान केले होते. त्यातल्याच उरलेल्या पैशातून संस्थेने एक ॲम्ब्युलन्स घेतली आणि आरोग्य क्षेत्रामध्येही जोमाने काम करायला सुरुवात केली. या ॲम्ब्युलन्समधून एक डॉक्टर आजूबाजूच्या सहा खेड्यांमध्ये जात असे आणि गरीब, वंचित लोकांना प्राथमिक आरोग्य सेवा पुरवत असे. ज्या रुग्णांना पुढच्या उपचाराची गरज आहे, अशा रुग्णांना चंद्रपूर किंवा गडचिरोली शहरातल्या रुग्णालयात संस्था स्वतः आणून भरती करत असे. या सर्व कामांचा फायदा असा झाला की, तिथल्या नागरिकांमध्ये समितीच्या कार्यकर्त्यांबद्दल विश्वास, जिव्हाळा निर्माण झाला. त्याच उदाहरण द्यायचं म्हणजे एका गावामध्ये संस्थेचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना भेटायला गेले होते, त्यावेळी त्या गावात नक्षलवादी शिरले होते. गावकऱ्यांना असं वाटलं की, हे तर बाहेरून आलेले लोक आहेत. त्यांना नक्षलवादी पहिल्यांदा टार्गेट करतील, ते लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी आपण होऊन या सर्व कार्यकर्त्यांना आपल्या घरात राहायला ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नक्षलवादी गेल्यावर त्यांना बाहेर पडायला सांगितलं होतं. स्थानिकांचा असा प्रतिसाद मिळाल्यामुळे पाच छात्रावास सुरू झाली. १५ ऑगस्ट २००४ रोजी चंद्रपूरमध्ये अनाथालयही सुरू करण्यात आलं. याचं कारण म्हणजे लाहेरी गावाजवळील पाच-सहा गावांमध्ये नक्षलवाद्यांकडून मारले गेलेले वडील आहेत किंवा दोघेही पालक मारले गेले आहेत, अशी अनेक मुले दिसून आली होती. त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून अनाथालय सुरू करण्यात आलं. त्या अनाथालयाच्या जागेसाठी सुरुवातीला एका कार्यकर्त्यांनी आपलं स्वतःचं घर वापरायला दिलं होते. ते चंद्रपूर शहरातल्या मध्यवर्ती भागातल्या आपल्या घरात एकटेच राहत असते. सुरुवातीला त्या घरात अशा मुलांना आणून त्यांच्या निवासाची सोय केली होती. वर्ष-दोन वर्षांनी याच कार्यकर्त्यानी असं सांगितलं की, मला आता एकट्याला एवढ्या मोठ्या घराची गरज नाही. तुम्ही हे संपूर्ण घरच अनाथालयासाठी वापरायला घ्यावं आणि मध्यवर्ती ठिकाणाचे हे घर अनाथालय म्हणून संपूर्णपणे वापरायला मिळाले. त्यानंतर सरकारी जमीनही मिळाली आणि आता सरकारी जमिनीवर एक चांगलं सुविधायुक्त असे “आश्रय” छात्रावास उभे राहिले आहे. संस्थेने आर्थिक मदतीसाठी आणखी एक पाऊल उचलले ते म्हणजे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनाही मदतीची विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा संस्थेला २५ लाख रुपयांची देणगी दिली. आता या अनाथालयाचे छात्रावासामध्ये रूपांतर करण्यात आले आहे. या ठिकाणी अनाथ आणि शिकायला येणारी दोन्ही प्रकारची मुलं निवास करतात. अशा रीतीने संस्थेची चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज ५ छात्रावास चालत असून दीडशेच्या वर मुलं इथे निवासी स्वरूपात राहत असतात.
त्यानंतर आरोग्य सेवा वाढवण्याकडे सुद्धा लक्ष पुरवण्यात आले. एटापल्ली इथल्या पिथा या गावाच्या आजूबाजूच्या जवळजवळ २५ गावांमध्ये थोडं फार सुशिक्षित असलेल्या तरुणांना प्रशिक्षण देऊन आरोग्य रक्षकच काम देण्यात आले. आज हे आरोग्य रक्षक या २५ गावांमध्ये प्रथमोपचार देत आहेत. सर्दी, खोकला, हगवन, डोकेदुखी अशा सामान्य आजारांवर गावातच औषध देण्याची सोय या योजनेमार्फत करण्यात आली आहे. त्यातूनही ज्या रुग्णांना बरं वाटत नाही, त्यांना शहरात आणून त्यांच्यावर औषधोपचार केले जातात. या गावांमध्ये दर आठवड्याला डॉक्टर जातात, तेही थोड्या मानधनावर समाजसेवा म्हणून हे काम करत असतात. या सर्व तालुक्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेतच पण तरीसुद्धा डॉक्टर हेडगेवार दवाखाना यावर इथल्या लोकांचा विश्वास आहे. या ग्रामीण आदिवासी लोकांना डॉक्टर हेडगेवार कोण हेही कदाचित माहीत नसेल परंतु डॉक्टर हेडगेवार दवाखान्यात औषध मिळतात, तिथे चांगले औषधोपचार मिळतात, असे ते एकमेकातही बोलत असतात. याशिवाय गडचिरोली आणि चंद्रपूरसारख्या जिल्ह्यांना नक्षलग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात तसेच एका कोपऱ्यात असल्यामुळे तिथे काहीस दुर्लक्षच होत. अशा वेळी तिथे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या काळातही तिथल्या स्थानिकांना समितीतर्फे मदत केली जाते. आता नुकतेच जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे तिथे पूरस्थिती निर्माण झाली होती. जवळपास चाळीस गावं पाण्याखाली गेली होती. त्या लोकांना घराला ताडपत्री देणं, अंथरूण पांघरून, कपडे, खाणंपिणं देणं संस्थेने केलं आहे. ही कामं अतिशय निरपेक्ष वृत्तीने आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता केली जातात. नैसर्गिक आपत्ती, नैमित्तिक आणि दैनंदिन अशा सर्वच काळात संस्था स्थानिकांना मदत करत आहे. सध्या उभारण्यात आलेल्या छात्रावासामध्ये पाच प्रकारची काम चालतात. छात्रावास, दर रविवारी दवाखाना आणि संस्कार केंद्र इथे चालवलं जाते. या संस्थेचे वेगळेपण म्हणजे सध्याचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे पिताश्री मधुकरराव भागवत हे या संस्थेचे संस्थापक होते. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांचे पिताश्री सच्चिदानंद मुनगंटीवार हेही संस्थेचे माजी अध्यक्ष होते आणि सध्या तोटे हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. संस्थेची आता आश्रय या नावाने स्वतःची इमारत उभी आहे; परंतु सुरुवातीच्या काळात अक्षरशः घरोघरी कार्यालयाचे काम चालत असे. अगदी सुरुवातीचे कागदपत्र ठेवण्यासाठी पहिलं कपाट मधुकरराव भागवत यांनी संस्थेला दिलं आहे. त्यानंतर संघ कार्यालयाकडून एक भाड्याची खोली घेऊन कार्य सुरू होत, आता गेल्या पाच वर्षांपासून स्वतःच्या स्वतंत्र अशा कार्यालयातून संस्थेच काम चालत आहे. यापुढे अधिकाधिक आरोग्य शिबीर घेऊन आरोग्य सेवा वाढवणं हे संस्थेच्या मनात आहे तसेच गडचिरोली जिल्हा हायड्रोसिल मुक्त करण्याचा मानस आहे. या भागात होणारा हायड्रोसिल हा आजार असा आहे की, तो लपवला जातो. अशा रुग्णांना शोधून काढून त्यांचं निदान करणे आणि औषधोपचार देणे तसंच त्यांना विनामूल्य उपचार देणे असं काम अधिक जोमाने करायचं आहे. त्याचप्रमाणे या जिल्ह्यांमध्ये अजूनही गरीब, वंचित विद्यार्थी शिक्षणापासून दूर आहेत, त्यांच्यासाठी अजून काही छात्रावास उभारणं ही सुद्धा पुढची एक योजना आहे. कोणत्याही संस्थेला ३२ वर्षं हा तसा कमी कालावधी आहे पण समितीनं ३२ वर्षात चंद्रपूर आणि गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये फारच वेगाने काम करून तिथल्या वंचित आणि दुर्बल घटकांसाठी मोठे जाळ विणलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.