विलास खानोलकर
बरसोरजी हे पारशी गृहस्थ अक्कलकोटात कामदार होते. एके दिवशी मुंबईचे त्यांचे आप्त ‘नवरोजी’ त्यांना भेटण्यास अक्कलकोटी आले. बंगल्याची दारे-खिडक्या लावून रात्री ते दोघेही श्री स्वामी समर्थांच्या लीलांबद्दल बोलत होते; परंतु लीला नवरोजीस खऱ्या वाटेनात. इतक्यात श्री स्वामी महाराज अकस्मात त्या दोघांच्यामध्ये येऊन बसले. त्या दोघांनाही आश्चर्य वाटले.
श्री स्वामींना साष्टांग नमस्कार घालून नवरोजी म्हणाले, ‘महाराज, दारे खिडक्या बंद असता आपण कसे आलात?’ पुढे त्याचे प्रर्थना करून म्हटले, ‘महाराज मला कर्ज झाले आहे ते फिटून पुष्कळ संपत्ती मिळावी अशी श्री स्वामी चरणांजवळ विनंती आहे.’ त्यावर श्री स्वामी म्हणाले, ‘मिळाल्यावर काय देशील? प्राप्तीचा चौथा हिस्सा देशील?’ नवरोजी उत्तरले, ‘प्राप्तीचा चौथा हिस्सा देईन.’ श्री स्वामी समर्थ म्हणाले, ‘नर्मदेकडे जा.’ असे सांगून ते एकाकी गुप्त झाले. दुसऱ्या दिवशी नवरोजी रामपुरास श्री स्वामींच्या दर्शनास गेला. ‘गुजरात देशाचे बोलावणे आले आहे. श्री स्वामी मुखातील हे वाक्य ऐकून ते मुंबईस आले.तेथे येताच बडोद्याहून श्रीमंत मल्हारराव गायकवाड यांचे बोलावणे आल्याचे त्यांना समजले. ते ताबडतोब बडोद्यास (गुजरात) आले. ते श्रीमंतांना भेटताच त्यांनी नवरोजीस सन्मानपूर्वक द्रव्य आणि वस्त्रालंकार देऊन सांगितले की, ‘अक्कलकोटचे महाराजांस कसेही करून इकडे घेऊन या.’ त्यानुसार त्यांनी ब्राह्मण भोजन घातले. नंतर प्रार्थना करून श्री स्वामींना सांगितले की, ‘महाराज आपणास श्रीमंत मल्हारराव गायकवाड यांनी बोलविले आहे. त्यावर श्री स्वामी म्हणाले, ‘आम्ही येत नाही जा.’ असे ऐकताच नवरोजी मुंबईस निघून आले. त्यांनी ‘महाराज, तिकडे येत नाहीत. पुष्कळ खटपट केली; परंतु व्यर्थ गेली,’ असे कळविले. नवरोजीस श्री स्वामी कृपेने पुष्कळ द्रव्य मिळून ते कर्जमुक्त झाले.