श्रीनगर : दहशतवादी शाहनवाज याच्या कुटुंबीयांनी ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमांतर्गत घरावर राष्ट्रध्वज फडकावला आहे. शाहनवाज याचे कुटुंबीय अजूनही भारतात राहतात. त्याच्या या कृतीने सारेच आश्चर्यचकित झाले आहेत. यावेळी शाहनवाजच्या वडिलांनी त्याला एक संदेशही दिला आहे. मुलाने दहशतवादाचा मार्ग सोडून पुन्हा भारतात यावे, अशी शाहनवाजच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. आमचे सगळे हिंदुस्तानात आहे. पाकिस्तानशी आमचा कोणाताही संबंध नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
शाहनवाज कंठचे २२ वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यानंतर त्याला प्रशिक्षण देत दहशतवादी बनवले होते. आपला मुलगा पुन्हा भारतात परतावा व त्याने दहशतवादाच्या दलदलीतून बाहेर पडावे, अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आजच्या अमृत महोत्सवी दिनाच्या निमित्ताने त्यांनी शाहनवाजला पुन्हा परतण्याचे आवाहन केले आहे.
किश्तवाडयेथील हुलर गावात राहणारे अब्दुल रशीद कंठ आणि त्यांचा दुसरा मुलगा नवाज कंठ यांनी रविवारी नगर परिषदचे अध्यक्ष सज्जाद यांना फोन करुन तिरंगा देण्यास सांगितले. नगर परिषद अध्यक्ष सज्जाद यांनी तिरंगा दिल्यानंतर कुटुंबीयांसोबत घरावर मोठ्या दिमाखात ध्वजारोहण केले.
२००० मध्ये दहशतवादी शाहनवाजला घेऊन गेले होते. त्यानंतर त्याचा काहीच पत्ता नव्हता. २०१५ पर्यंत कधीतरी त्यांच्याशी संपर्क होत होता. मात्र, त्यानंतर आजपर्यंत त्यांच्यासोबत काहीच संपर्क झालेला नाही. आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी आम्ही आमच्या मुलाला परत येण्याचे आवाहन करत आहोत, असे शाहनवाजचे वडील अब्दुल रशीद कंठ यांनी म्हटले आहे.