कॅनबेरा (वृत्तसंस्था) : भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर तिरंगा फडकवला जात असताना परदेशी खेळाडूही मागे नाहीत. ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि वेस्ट इंडीजचा डॅरेन सॅमी यांनी सोशल मीडियावर भारतीय तिरंग्याचा फोटो पोस्ट करत स्वातंत्र्य दिनाचे सेलिब्रेशन केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने इंस्टाग्रामच्या माध्यमातून भारतीय चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरने लिहिले आहे की, भारतात उपस्थित असलेल्या सर्व मित्र आणि कुटुंबीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.
डेव्हिड वॉर्नरसह वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार डॅरेल सॅमीनेही सोशल मीडियाद्वारे भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डॅरेन सॅमीने टी-२० विश्वचषक ट्रॉफीसह फोटो शेअर करत लिहलंय की, भारताला स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारतातच मी माझ्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.