नाशिक (प्रतिनिधी): श्रावणातील तिसऱ्या सोमवारला विशेष महत्त्व असल्याने ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी रविवार दुपारपासून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये येऊ लागले. खासगी वाहनांना बंदी असल्याने एसटी महामंडळाच्या ३०० बसेसच्या तब्बल २५०० हून अधिक फेऱ्या झाल्या.
या फेऱ्यातून २ लाखांहून अधिक भाविकांची वाहतूक करण्यात आली. दरम्यान फेरी मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी २०० हून अधिक पोलिसही तैनात करण्यात आले होते. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी भाविक कुशावर्त येथे स्नान करून ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालतात.
कोरोना निर्बंधामुळे गेल्या दोन वर्षांपासून फेरीस प्रशासनाच्या वतीने मनाई करण्यात आली होती. मात्र यंदा शासनाच्या वतीने निर्बंध हटवल्याने प्रदक्षिणेस जाण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. गर्दीच्या नियोजनासाठी खासगी वाहनांना बंदी असल्याने त्र्यंबकेश्वरसाठी एसटीच्या वतीने ३०० जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. सकाळी ८ वाजेपासून रात्री उशिरापर्यंत जुने सीबीएस परिसरात बसेससाठी भाविकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.