महिलांची ‘रक्षित्रा’ – शीतल बोराडे

Share

अर्चना सोंडे

आपण उद्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करत आहोत. कोणत्याही देशाची प्रगल्भता ही देशाच्या वयावर नसते, तर त्या देशात स्त्री-पुरुषता समानता किती रुजली आहे, यावर ही प्रगल्भता मोजली जाते. आज भारतातील महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे. देशाला प्रगतिपथावर नेण्यात स्वत:चं योगदान देत आहे. आपल्या देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाची सर्वोच्च पदावरील व्यक्ती अर्थात राष्ट्रपती एक महिला आहे हे या प्रगल्भतेचंच द्योतक आहे. पुरुषप्रधान मानल्या गेलेल्या सिक्युरिटी क्षेत्रात एका महिलेने प्रवेश केला आणि अल्पावधीत स्वत:चा ठसा उमटवला. एवढंच नव्हे तर महिला सुरक्षा रक्षकांची फौजच निर्माण केली. हा क्रांतिकारी बदल घडविणारी ही उद्योजिका म्हणजे रक्षित्रा सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या शीतल बोराडे. शीतलचा जन्म बुलढाणाच्या भोंडे कुटुंबात झाला. जिल्हा बुलढाणा, तालुका खामगाव. वडील अकोल्यामध्ये एसटी महामंडळात डेपो मॅनेजर म्हणून कार्यरत होते. शीतलचं शिक्षण तिसरीपर्यंत अकोल्यात झालं. त्यानंतर वडिलांच्या बदलीमुळे एक वर्ष मुंबईत शिक्षण झाले. त्यानंतर पुन्हा बुलढाण्यात बदली करून घेतली. बुलढाण्यातील भारत विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण केले. बुलढाणा एडेड ज्यु. कॉलेजमधून अकरावी – बारावी केली, तर जी. एस. कॉलेज खामगावमधून आर्ट्समध्ये पदवीधर झाली.

शिक्षणानंतर नोकरीची ऑफर आली. तीन वर्षे सहकार विद्यामंदिर येथे शिक्षिका म्हणून नोकरी केली. याच दरम्यान २००३ मध्ये मुंबई स्थित सचिन बोराडे या उमद्या तरुणासोबत विवाह झाला. सचिन बोराडे हे भारतीय रेल्वेमध्ये लोकोपायलट आहेत.

लग्नानंतर अकरा ते बारा वर्षे शीतलने गृहिणीची जबाबदारी पार पाडली. या दरम्यान टिपिकल नोकरी न करता आपण काय वेगळे करू शकतो याचा विचार चालूच होता. नोकरी न करता व्यवसायच करायचा हे मनाशी पक्क झालं होतं. त्या सांगतात, “आई उल्का भोंडे आणि आजोबा नामदेव हिरोळे, हे दोघं माझे कायम आदर्श राहिले आहेत. मी इंग्रजी साहित्यात एमए करत असताना माझी आई संगीत विशारद एमए करत होती. तिनं उच्च शिक्षण घेतलं. आजोबा हे बुलढाण्यात शिक्षण अधिकारी होते. व्यवसाय करण्याचा विचार आला, तेव्हा त्या विचाराला माझ्या नवऱ्याने पाठिंबा दिला.” याच कालावधीत पेट्रोल पंपसाठी फॉर्म निघाले होते. तो शीतलने भरला. त्यानंतर फेसबुकवर सर्च करताना डिक्की या संस्थेची ओळख झाली. डिक्कीतील सीमा कांबळेची भेट झाली. संस्थेच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा आरती कांबळेची ओळख झाली. डिक्कीमध्ये प्रवेश कसा करावा, डिक्कीच्या सहाय्याने आपला व्यवसाय कसा वृद्धिंगत करावा, याचे ज्ञान या दोघींमुळे समजू लागले. डिक्कीचे सर्वेसर्वा मिलिंद कांबळे सरांची ओळख झाली आणि पेट्रोल पंपाच्या सगळ्या कामात डिक्की संस्थेची मदत झाली. डिक्कीचे दिल्लीतील पदाधिकारी अशोककुमार रंगा सरांची खूप मदत झाली. डिक्कीच्या सहकार्यामुळेच गेलेला पंप मला परत मिळाला. पेट्रोल पंपाच्या संपूर्ण कामकाजाला बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे इतर व्यवसाय करायचं ठरवलं होतं. त्यावर पुन्हा नव्याने काम करायला सुरुवात केली. कोरोना काळ सगळ्यांनाच वाईट गेला. माझ्यासाठीसुद्धा अत्यंत वाईटच होता. माझी सख्खी बहीण या कोरोनामध्ये मी गमावली होती. सगळं काही ठप्प झालं होतं.

काही दिवसाने सिक्युरिटी क्षेत्रात आपण वेगळं काहीतरी करू शकतो, हे जाणवलं. आमच्या कुटुंबात लष्करातील निवृत्त व्यक्ती होती. त्यामुळे हे आपण करू शकतो, याचा विश्वास होता. तसं प्रशिक्षणसुद्धा त्यांच्याकडून घेतलं. मग या क्षेत्रातला अभ्यास करायला सुरुवात केली. सुरुवातीला कोणाला या व्यवसायाबद्दल सांगायचे तेव्हा त्यांना आश्चर्य वाटायचे. मी महिला असून सिक्युरिटी क्षेत्रात कसा काय व्यवसाय करू शकते, याचं त्यांना अप्रूप वाटायचं, तर काहींना कोडं पडायचं. काही लोकं तर कुचेष्टेने असंही म्हणाले, “आमची सिक्युरिटी तुम्ही कराल, मग तुमची सिक्युरिटी कोण करेल…?” पण मी जिद्दीने माझा अभ्यास चालू ठेवला. लोकांना भेटणं चालू ठेवलं. परवाना, कंपनीची नोंदणी कशी करतात? याची माहिती गोळा केली. माझी संकल्पना होती की, महिलांचं व्यवस्थापन असलेली महिलांची ‘रक्षित्रा सिक्युरिटी एजन्सी’.

सुरुवातीला ओळखीच्या लोकांकडूनच कंपनीचं नाव नोंदणीकरण, ब्रॅण्डिंग सर्व करण्यासाठी दोन लाखांची गुंतवणूक केली. पण मनाला हवे तसे काम त्यांच्याकडून वेळेत झाले नाही. मला नुकसान सहन करावे लागले. पण न डगमगता रक्षित्रा सिक्युरिटीची स्थापना केली. विश्वासघात हा या व्यवसायाच्या सुरुवातीलाच पदरात आल्यामुळे आता प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकायचं ठरवलं. रक्षित्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हळूहळू विस्तारू लागली आहे. अनेक लोक आले आणि गेले. पण मी माझ्या व्यवसायावर ठाम होते. हेच करायचं. सिक्युरिटी एजन्सीसाठी लागणारा परवाना मिळविण्यासाठी जे निकष लागतात, ते पूर्ण करून मी परवाना मिळवला, हे माझं सगळ्यात मोठं यश आहे. आता रक्षित्राची टीम आहे. विविध क्षेत्रांतील क्लायंट्सना सुरक्षेच्या बाबतीत आता आम्ही सेवा देतो.

सेफ स्मार्ट आणि सिक्युअर्ड रक्षित्रा सिक्युरिटी बाऊन्सर्स, बॉडीगार्ड, होमगार्ड, मॅनपॉवर, हाऊसकिपिंग, कॉर्पोरेट सिक्युरिटी, सोसायटी सिक्युरिटी, पेस्ट कंट्रोल या सर्व सेवा आम्ही पुरवतो.

आपल्या देशात व्हीआयपी ओळखण्याची सोप्पी पद्धत म्हणजे सोबत सात-आठ सफारीवाले घेऊन फिरणारा माणूस. सलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटानंतर या सुरक्षा रक्षकांच्या कामाची तोंडओळख आपल्याला झाली. मात्र या क्षेत्रात महिला बॉडीगार्ड्सची तुलना नगण्यच आहे. ही कमतरता रक्षित्रा नक्कीच पूर्ण करेल. येथून पुढे महिला बॉडीगार्ड दिसली की आपल्याला शीतल बोराडेंची रक्षित्राच आठवेल, हे मात्र खरं.

Recent Posts

Pahalgam Terror Attack : आता मलाही मारा ना…! काल लग्न झालं अन् आज घरातून तिरडी उठणार

१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…

9 minutes ago

Chardham Yatra Scam : चारधाम यात्रेला जाताय सावधान! भाविकांची होतेय मोठी फसवणूक

देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…

27 minutes ago

अतिरेक्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू, ‘या’ दिवशी राज्यात येणार पार्थिव

मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…

29 minutes ago

काश्मीर खोऱ्यात लपले आहेत ५६ विदेशी अतिरेकी, सूत्रांची माहिती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…

1 hour ago

OTT: या आठवड्यात फक्त ओटीटीवर अ‍ॅक्शन दिसणार, हे १२ चित्रपट प्रदर्शित होतील..

नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अ‍ॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…

1 hour ago

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…

2 hours ago