अनुराधा दीक्षित
माझ्या माहितीत एक मुलगी… आता मोठी बाई आहे! साधीसुधी. तिचं नाव तेव्हा ऐकून मात्र मला प्रश्न पडला होता की, हिचं नाव असं का ठेवलं? तिचं नाव ‘भिकी’ होतं. तशी खात्यापित्या घरची होती. पण आई-वडील तिच्या वयाच्या मानाने खूपच वयस्कर दिसत. मी जेव्हा त्याबद्दल तिला ओळखणाऱ्या एकदोघांना विचारलं, तेव्हा एका बाईंनी सांगितलं, “अहो, त्या काका-काकूंना खूप वर्षं मूलबाळ नव्हतं. म्हणजे काकूंना दिवस गेले की, काही महिन्यांतच मिसकॅरेज व्हायचं म्हणून त्यांनी कुठल्याशा देवीला नवस केला की, ‘मला मूल होऊ दे. मी तुझ्याकडे भीक मागते!’ त्या देवीला नवस केल्यावर लाकडी बाहुली वाहण्याची पद्धत होती. तशी त्यांनी ती वाहिली होती. गंमत म्हणजे वर्षभराने त्यांना एक नाजूकशी मुलगी झाली. ती देवीकडे भीक मागून झालेली, म्हणून तिचं नाव त्यांनी ‘भिकी’ ठेवलं होतं!”
इतकी सुंदर नावं मुलींची असताना हे नाव त्या पोरीला आयुष्यभर चिकटलं याचं वाईट वाटत होतं. उतारवयात झालेली ही मुलगी आई-बाबांची खूप लाडकी होतीच. पण ती मुलगी त्यांच्याबरोबर कुठे जात असली की, आजी-आजोबांबरोबर चाललेली ती नात वाटायची. काहीजण त्यांना तसं विचारायचीही. पण असेही असले, तरी ते भिकीचे आई-बाबाच होते आणि त्यांचं अगदी प्रेमळ कुटुंब होतं. भिकी एकुलती एक मुलगी होती. वडील शिवणकाम, तर आई घरगुती खानावळ चालवायची. त्यातून त्यांचा बरा निर्वाह चालू होता. यथावकाश तिचं जेमतेम दहावी पास झाल्यावर लग्न झालं. तेव्हा नवऱ्याने आपल्या ‘मनोहर’ या नावाला साजेसं ‘मोहिनी’ नाव ठेवलं, तेव्हा भिकीला खूप आनंद झाला. लग्नानंतर तरी लोक आपल्याला छान नावाने हाक मारतील, असं तिला वाटलं. पण कसलं काय? तिचे आईवडील तर तिला ‘भिकी’च म्हणत होते. पण सासर-माहेर एकाच गावात असलेल्या तिला सगळे भिकी नावानेच ओळखत होते. पण म्हातारी होईपर्यंत ‘भिकी ती भिकी’च राहिली बिचारी!
‘नावात काय आहे?’ असं शेक्सपिअर म्हणाला होता. पण नावात बरंच काही आहे. ‘नाव सोनूबाई नि हाती कथलाचा वाळा’ अशी लहानपणापासून म्हण ऐकत आले. एक वेळ हातात सोनं नसेना का, पण नावात तर सोनं आहे! असो. या नावावरून आठवलं…
मी शाळेत शिक्षिका होते. त्यामुळे अर्थातच माझ्या हाताखालून शेकडो विद्यार्थी शिकून गेले. वर्षाच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांची ओळखपरेड व्हायची. तेव्हा नेहमीपेक्षा काही छान छान नावं कानावर पडायची! साधारण २५-३० वर्षांपूर्वी मी नववीच्या वर्गाची मी क्लास टीचर होते. मी मुलांना नावं विचारत होते. तर एका मुलीनं आपलं नाव ‘निराशा’ सांगितलं. बिचारी किती गोड चेहऱ्याची, हसतमुख मुलगी होती!
मी तास संपवून स्टाफ रूममध्ये हा विषय काढला, तेव्हा कळलं की, ओळीने पाच मुली झाल्या, म्हणून या सर्वात धाकट्या मुलीचं नाव त्यांनी ‘निराशा’ ठेवलं. तेव्हा मी मात्र ठरवलं की, मी या मुलीला ‘आशा’ नावानेच हाक मारणार. वर्गातही सगळ्यांना सांगितलं, हिला सर्वांनी ‘आशा’ नावानेच हाक मारायची! आशाच्या आईबाबांनी मुलाची वाट बघून पाच मुली जन्माला घातल्या. वंशाच्या दिव्यासाठी केवढं हे दिव्य! पण कधीतरी तिला वाटतच असेल की, आपल्या आई-वडिलांना आपण निराश केलंय. आपण नावडत्या आहोत. त्या बालवयात तिच्या मनात कोणत्या भावना निर्माण झाल्या असतील? काही शिक्षिका मैत्रिणींनी मला अधिक माहिती पुरवली की, त्यांच्याही शाळेत त्यांना ‘नकोशी’ ‘कंटाळा’ नावाच्या मुली भेटल्या. तेव्हाची पालकांची मानसिकता त्यावरून दिसत होती.
एखादी मुलगी गैरहजर असेल, तर कारणं कधी आईचं बाळंतपण, आजारपण, कधी शेतात लावणी लावायला जाणं असं काहीही असायचं. आजच्यासारखी मुलांच्या लग्नाची समस्या तेव्हा निर्माण झाली नव्हती. मुलगा झाला नाही म्हणून तेव्हाच्या ‘निराशा’, ‘नकोशी’ ‘कंटाळा’ म्हणून जन्माला आलेल्या मुली कदाचित त्यांच्या लग्नानंतर कुणाला ‘हव्याशा’ही वाटत असतील. पण आता ‘हव्याशा’ वाटणाऱ्या मुलींनी मुलांची पार ‘निराशा’ केली आहे, हा निसर्गानेच पालकांना दिलेला न्याय म्हणावा का?