मुंबई : विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेवर माझा विश्वास बसला नाही. मराठा समाजासाठी सातत्याने लढणारा एक नेता हरपल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. मराठा समाजासाठी न्याय देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. गेल्याच आठवड्यात विनायक मेटे मला भेटले होते, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विनायक मेटे यांच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या घटनेच्या तपासासाठी रायगड पोलिसांच्या आठ टीम तयार करण्यात आल्या आहेत. शासन विनायक मेटे यांच्या परिवारासोबत आहे. त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ते आज मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भातील बैठकीला येत असताना त्यांचे अपघाती निधन झाले आहे. मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी त्यांची मोठी धडपड, तळमळ होती. शासन नक्कीच त्यांच्या भावनेसोबत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.