Thursday, April 24, 2025
Homeसाप्ताहिककोलाजदोघांच्या भांडणात मध्यस्थीचा मृत्यू

दोघांच्या भांडणात मध्यस्थीचा मृत्यू

अॅड. रिया करंजकर

आज समाजात आजूबाजूला बघितलं, तर आपल्याला असं लक्षात येईल, काही लोक दुसऱ्यांचं चांगलं व्हावं म्हणून मनापासून धडपडत असतात व तसं समाजकार्यही ते करत असतात. हे करताना ते कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करत नाहीत. पण ही समाजसेवा किंवा सहकार्य केव्हा केव्हा त्यांच्या जीवावरही बेतू शकतं.

वसई-विरार या ठिकाणी घडलेली ही घटना. या ठिकाणी रामचंद्र व जयचंद्र हे दोघे सख्खे भाऊ एकत्र राहत होते. त्यांच्यासोबत त्या दोघांच्या बायका व मुलं असे एकत्र कुटुंब या ठिकाणी नांदत होतं. रामचंद्र व जयचंद्र हे मेहनती होते. दिवसभर कष्टाची कामे करायचे व आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करायचे. पण कष्टाची काम करताना त्या दोघाही भावांना दारूचे व्यसन मात्र होतं. हे दारूचे व्यसन कधी कधी आपल्या सर्व नाशाचाही कारण ठरतं. हे दोघे भाऊ दररोज दारू पिऊन यायचे आणि दररोज क्षुल्लक गोष्टींवरून भांडत बसायचे. त्यांच्या शेजारी बायो नावाच्या ६२ वर्षांच्या वयोवृद्ध काकी राहत होत्या. त्यांच्याशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते. त्या नेहमी या दोघांची भांडणं झाली की समजवायला व भांडण मिटवायला येत असत व प्रेमाने त्या दोघांची समजूत घालत असत.

हे नेहमीच झालेलं होतं. पण त्या दिवशी रामचंद्र आणि जयचंद्र काम पूर्ण करून येताना दोघेही दारू पिऊन आले व राहत्या घराच्या विषयावरून जोरजोरात भांडू लागले आणि त्यात भरीस भर म्हणून त्यांच्या बायकाही मोठमोठ्याने एकमेकांशी भांडू लागल्या. म्हणजे पूर्ण कुटुंब एकमेकांशी घराच्या विषयावरून जोरजोरात भांडत होते. भांडणावरच विषय न थांबता तो हाणामारीपर्यंत येऊन ठेपला. त्यावेळी शेजारची बायो काकू नेहमीप्रमाणे त्यांना समजावण्यासाठी मध्यस्थी करायला गेली व समजावू लागली. त्यावेळी जयचंद्र खोऱ्याच्या लाकडी दांडाने मोठ्या भावावर म्हणजे रामचंद्रवर वार करायला निघाला. तेव्हा बायो काकू मध्ये पडल्या आणि रामचंद्रला बाजूला ढकलले. पण जयचंद्रचा वार ताकदीनुसार असल्यामुळे तो खोऱ्याचा दांडा बायो काकूंच्या डोक्यावर आदळला. त्यांना जागच्या जागी चक्कर आली व त्या खाली कोसळल्या आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला.

लहान भावापासून मोठ्या भावाला वाचविण्यासाठी त्या मध्यस्थी पडल्या आणि नाहक त्यांचा बळी गेला. दोन भावांमधील क्षुल्लकशा कारणामुळे शेजारच्या काकूंचा जीव गेला. त्या नेहमी त्यांच्या भांडण मिटवायला येत. त्या समजूत घालवायला येत. त्या त्यांच्या हितचिंतक होत्या. पण आज याच हितचिंतकाचा बळी या दोन भावांच्या भांडणांमध्ये गेला. त्या बायो काकूने विचारही केला नसणार की, मी यांची समजूत घालायला जाते. पण हा ‘आज’ नेहमीप्रमाणे असणार नाहीये. आज माझा जीव जाणार आहे, याची कल्पनाही त्यावेळी त्यांना कदाचित नसेल. दारूच्या नशेमध्ये दोन भावांमध्ये झालेली भांडणं हाणामारीपर्यंत येऊन ठेपली आणि दोन भावांच्या भांडणांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या काकूंचा मात्र विनाकारण बळी गेला. वसई-विरार ठाण्यामध्ये व न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे.

(सत्य घटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -