सतीश पाटणकर
कोकणातील मत्स्यक्षेत्र बहुतकरून रूढीप्रिय असून सध्या ते तांत्रिकदृष्ट्या कमी विकसित आहे. छोट्या मच्छीमारांचे त्यात अधिक्य आहे. उत्पादनाचे स्रोत व आहारसुरक्षा कोरोनाकाळात चालू ठेवणे अर्थव्यवस्थेसाठी गरजेचे आहे. फिशरीज सेक्टर त्यापैकी एक आहे. कोकणाच्या तीन बाजूंस सागरी किनारा आहे. त्याची एकूण लांबी ७२० किमी आहे. किनाऱ्यानजीकच कॉन्टिनेंटल शेल्फ आहे; परंतु यातून आपल्याला मिळणारे मासे उत्पादन फार कमी आहे. किनाऱ्यापासून दूर खोल समुद्रात मासेमारीला खूप वाव आहे. त्यामुळे जपान, तैवान या देशांप्रमाणेच मत्स्य संवर्धन करणे आपल्यालाही शक्य होईल.
निसर्गाच्या कृपेने समृद्ध असा कोकण प्रदेश आहे. लहान-मोठ्या दऱ्या, समुद्राला जोडणाऱ्या खाड्या, समुद्रकिनारा यामुळे मत्स्यव्यवसाय हा कोकणातील प्रमुख व्यवसाय आहे. मत्स्यव्यवसायाचे प्रामुख्याने तीन विभाग पडतात. सागरी मत्स्यव्यवसाय, निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय आणि भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय. मासेमारीबरोबर मत्स्यसंवर्धन ही संकल्पना अलीकडे दृढ होत चालली आहे. कोकणात सागरी मत्स्यव्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. ठाणे व रायगड जिल्ह्यात तळी तलावांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने या जिल्ह्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय करण्यात येतो. कोकणातील खाडीलगतचे खाजण जमीनक्षेत्र कोळंबी संवर्धनासाठी उपयोगात आणण्यात येते. कोकणात मासेमारी या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांची संख्या फार मोठी आहे. आपल्याकडे खाऱ्या पाण्याचे एकूण क्षेत्रफळ ३९ लाख हेक्टर आहे. त्यातून १४ लाख हेक्टर क्षेत्र कोळंबी आणि मत्स्य संवर्धनास योग्य आहे; परंतु यातील फक्त दीड लाख हेक्टर क्षेत्रातच सध्या निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती होते. वरील सर्व क्षेत्राचा निम्मा भाग जरी मत्स्यशेतीअंतर्गत आणला तरी आपले वार्षिक मत्स्य उत्पादन दुप्पट होऊ शकते.
कोकणच्या किनारपट्टीवर मत्स्य व्यवसायाला फार मोठा वाव आहे. सहा लाख टन उत्पादनाची क्षमता असणाऱ्या राज्याच्या किनारपट्टीवर सध्या केवळ साडेचार लाख टन उत्पादन घेतले जाते. हे उत्पादन वाढविण्यासाठी मच्छीमारांनी पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देण्याची आवश्यकता आहे. कोकणच्या मोठ्या किनारपट्टीचा आपण जेवढा फायदा घ्यायला हवा तेवढा आपण घेत नाही. सध्या साडेचार लाख टन एवढेच मत्स्योत्पादन केले जात आहे तसेच सध्या ५० मीटरपर्यंत जी मच्छीमारी केली जाते, ती १०० मीटरपर्यंत केली जाऊ शकते.
राज्यातील मच्छीमार खोल समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी जात नाहीत. बहुसंख्य मच्छीमार हे जवळच्या समुद्रातच मासेमारी करतात. मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी समुद्रात खोलवर जाणे आवश्यक असते आणि त्यासाठी त्यांच्या यांत्रिकी बोटींची क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. पण अजूनही पारंपरिक नाव आणि बोटींवरच मच्छीमारांचा भर आहे. मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी मच्छीमारांची दृष्टीच बदलण्याची गरज आहे. मत्स्योत्पादनात वाढ करण्यासाठी अलीकडे समुद्रातील पिंजऱ्यातील मत्स्यसंवर्धनावर भर देण्यात आला आहे. किनारपट्टीवरील सुमारे ३८ हजार ७७१ चौ. मी. क्षेत्रात या पद्धतीने मत्स्य संवर्धन करणे शक्य आहे. प्रारंभी यापैकी केवळ १० टक्के क्षेत्राचा वापर केल्यास दोन लाख ७० हजार टन अधिक उत्पादन मिळू शकेल.
आज-काल सी फूडचीदेखील मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. यामध्ये त्वरित खाद्याचे व साठवणुकीचे प्रकार असे दोन भाग करण्यात येतात. त्वरित खाद्य प्रकारात मत्स्य कटवडे, वडा, मत्स्य भजी, कोळंबी पकोडा आदी पदार्थ बनविले जातात. साठवणुकीच्या प्रकारात कोळंबी लोणचे, कोलीम चटणी, कालवाचे लोणचे आदी पदार्थ बनविले जातात. आधुनिक तंत्रज्ञान वापरून ताजी मासळी पॅक अथवा हवाबंद डब्यात भरून ठेवता येते व आपल्या सोयीनुसार वापरता येते. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका असणारे मत्स्यव्यवसाय क्षेत्र राज्याला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देते. मत्स्यव्यवसाय क्षेत्र रोजगारनिर्मितीला पूरक आहे. उपलब्ध मत्स्यसाठ्याचे योग्यरीतीने व्यवस्थापन करून मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. शासकीय योजनांचा लाभ मच्छीमार बांधवांनी घेतल्यास येणारा काळ या व्यवसायासाठी फलदायी ठरेल. गेल्या दोन वर्षांत पश्चिम किनारपट्टीवरील समुद्रातील मत्स्योत्पादन अनेक कारणांनी झपाट्याने कमी होत आहे. वाढते शहरीकरण, तिवरांच्या बेटांचा झपाट्याने होणारा नाश, माशांच्या प्रजोत्पादनाच्या काळात होणारी मासेमारी, पाण्याचे प्रदूषण, गाळाची समस्या, बड्या कंपन्यांच्या ट्रॉलर्सकडून मोठ्या प्रमाणावर होणारी मासेमारी यामुळे मत्स्योत्पादन घटले आहे व याकडे सर्वच संबंधित घटकांचे दुर्लक्ष होत आहे.
पाण्याच्या प्रदूषणामुळेही माशांचा व माशांच्या अंड्यांचा मोठ्या प्रमाणावर नाश होत आहे. मच्छीमारांच्या अनेक समस्यांपैकी माशांचे घटते उत्पादन ही एक मोठीच समस्या आहे. कोविड-१९ने खूप काही घेऊन गेले तसे खूप काही देऊनही गेले. माणसाला अंतर्मुख होऊन स्वतःकडे पाहायला लावले. आपली विकासाची दिशा आणि वेग याबद्दल पुन्हा एकदा फेरविचार करण्यास भाग पाडले. लॉकडाऊन काळातील चर्चा, मग त्या सामान्य लोकांच्या आपापसांतील असतील किंवा अभ्यासकांच्या, त्यातून माणसाने निसर्गाचे त्याच्याकडून होणारे दोहन थांबवले नाही, तर त्याचे भविष्यही सुरक्षित नाही. त्यामुळे माणसाने निसर्गसंवेदी जगायला शिकला पाहिजे. निसर्गाला ओरबाडणे थांबवायला हवे, असाच काहीसा त्या चर्चेचा सूर होता. एक विषाणू माणसाला एकटा हादरवून सोडू शकतो, तर मग माणसाने वातावरणात किती प्रमाणात विष, प्रदूषके पसरवून ठेवली आहेत. या सगळ्या गोष्टी परतून आल्या, तर माणसाचे काही खरे नाही. माणसाने भानावर येऊन आपल्या विकासाची दिशा ठरवायला हवी. या संबंधात मच्छीमारांच्या संघटनांना मार्गदर्शन करावे लागेल.