Friday, October 4, 2024
Homeसाप्ताहिककोलाजहरवलेली मुले!

हरवलेली मुले!

प्रियानी पाटील

नऊ वर्षांपूर्वी हरवलेली पूजा गौड ही मुलगी नुकतीच सापडली आणि यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली ती एएसआय राजेंद्र भोसले यांनी. त्यांनी सेवेत असताना या हरवलेल्या मुलीच्या केसवर दोन वर्षे काम केले. पण त्याआधी त्यांनी अशा प्रकारच्या १६५ केसेस सोडवल्या होत्या. पण ही १६६वी केस त्यांना सोडवता आली नव्हती. या प्रकरणी त्यांनी हार न मानता निवृत्तीनंतरही ७ वर्षे जीवाचे रान करत त्या मुलीचा शोध घेतला आणि अखेर ती मुलगी सापडली.

मुलं हरवण्याच्या अनेक केसेस घडतात, काही सापडतात… काही तशाच पडून राहतात. पण मूल हरवणं आणि ते सापडणं या काळात आई-वडिलांच्या आयुष्याची जी वाताहत होते ती त्यांनाच ठाऊक असते.

अनेकदा मुलं हरवल्याच्या बातम्या आपल्या पाहण्यात, ऐकण्यात येतात. खूप ठिकाणी अशा हरवलेल्या मुलांचे फोटो आपण पाहतो. पण प्रश्न पडतो मनाला, ही हरवलेली मुलं त्यांच्या पालकांना परत मिळाली असतील का? नसतील तर कुठे असतील? अशी कशी हरवतात ही मुलं? आणि या हरवलेल्या मुलांच्या पालकांची मन:स्थिती कशी असेल? काय परिस्थिती ओढवत असेल अशा पालकांच्या मुलांवर? या मुलांचा शोध घेतला जात असेल का? गुन्हेगार पकडले जात असतील का? असे अनेक प्रश्न पडतात.

मुलं हरवण्याची अनेक ठिकाणं असतात. गर्दीच्या ठिकाणी पालकांनी आपल्या मुलांवर विशेष नजर ठेवली पाहिजे. त्यांचा हात पकडून आपले मूल आपल्या सोबत कसे राहील याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. अलीकडे मोबाइलमुळेही मुलांकडे दुर्लक्ष होताना दिसून येते. पालकांचे मोबाइलवर असताना मूल आपल्या सोबत आहे की नाही याचा विसर पडू शकतो. मूल पालकांचा हात सोडून कुठेही जाऊ शकते. बोलण्याच्या नादात आपण मुलाचा हात हातात पकडला आहे ना? याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

पालक आणि मुलांमध्ये संवाद असणं आवश्यक असतं. मुलाला बाहेरच्या ठिकाणी कुणी त्रास देत असेल, कुणी त्याच्यावर नजर ठेवून असेल, कुणी त्याला खेळणी, खाऊचे आमिष दाखवून फसवण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते प्रथम पालकांच्या नजरेत येणं गरजेचं आहे. याबाबतच्या सक्त सूचना प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना देणे गरजेच्या आहेत.

आपलं मूल हरवणं ही कल्पनादेखील कोणत्याही आई-वडिलांसाठी सहन होण्याजोगी नाही. प्रत्येक मूल हे आपल्या आई-वडिलांच्या काळजाचा तुकडाच असते. प्रवासात, गर्दी, जत्रेच्या ठिकाणी आपल्या मुलांना हाताशीच धरून ठेवलं पाहिजे. अनोळखी व्यक्तींपासून त्याला दूर ठेवलं पाहिजे. बाहेर काय खावे, काय खाऊ नये याबाबत मुलांना समजावणे आवश्यक आहे. ट्रेनमध्ये, बसमध्ये चढताना पालकांनी मुलाला सोबत घेऊनच चढावे. अन्यथा पालक आत, मुलं बाहेर किंवा मुलं आत पालक बाहेर असे प्रकार घडल्याने मूल हरवण्याची अधिक शक्यता असते.

शाळेमध्ये मुलांना सोडताना अनेकदा आपलं मूल व्यवस्थित घरी येईल या आशेत काही पालक असतात. पण एखाद वेळेस दुर्दैवाने एखादं मूल हरवलं, तर तो क्षण त्या पालकांसाठी अतिशय दु:खदायक ठरून जातो. शाळांमधून मुलं हरवण्याचे प्रकार खरं तर घडू नयेत. पण दुर्दैवाने असे प्रकार घडल्याचे कानी येतात तेव्हा मन हेलावतं. अलीकडे अशा घटनाही ऐकिवात आल्या आहेत. हरवलेल्या मुलांचा आकडा वाढतो, काही मुलं सापडतात, काही सापडत नाहीत. काय होत असेल अशा मुलांचं? मुलं पळवून नेणाऱ्या टोळ्या, व्यक्ती जर शाळेच्या आसपास संशयास्पद आढळल्यास त्वरित पोलीस स्टेशनला कळवणे गरजेचे आहे.

शाळेत येणारी मुलं ही शाळेची जबाबदारी असते, तर मुलं एकदा का शाळेच्या गेटच्या बाहेर गेली, तर ती शाळेची जबाबदारी राहत नाही, असेही ऐकिवात येते. मग मुलांच्या सुरक्षिततेचे काय? पालकांकडून कधी शाळेत जाण्यास उशीर झाला आणि या दरम्यान दुर्दैवाने त्या मुलासोबत काही अनुचित प्रकार घडला, तर त्या मुलाने काय करावं? मुलींच्या सुरक्षिततेचे काय?

शहराच्या ठिकाणी अनेकदा मुले हरवण्याचे प्रकार घडतात. या घटनांनी काळीज हेलावतं. रेल्वेचे प्लॅटफॉर्म, बस स्टेशन, शाळांची ठिकाणं, जत्रा, दूरचे प्रवास अशा ठिकाणांहून विशेषत: मुले हरवण्याचे किंवा मुलांना पकडून नेण्याचे प्रकार घडतात. यावर वेळीच लक्ष ठेवले, पोलीस कम्प्लेंट तसेच सीसीटीव्हीच्या आधारे मुलांचा तत्काळ शोध घेतला, तर ती मुले सापडूही शकतात. पण काही वर्षे लोटली, तर आपलं माणूस दुरावलं जातं.

इथे केवळ लहान मुलेच नाही, तर मोठ्यांच्या बाबतीतही असे प्रकार घडतात. वयस्कर माणसांच्या बाबतीतही असे हरवण्याचे प्रकार होतात. यावेळी त्यांना विस्मरणाचा प्रकार असतो. अशा वेळी त्यांच्यावर घरातील माणसांनी लक्ष ठेवणे आवश्यक असते. तरुण मुली घरातून निघून जाण्याचे प्रकार म्हणजे आईच्या काळजालाच घोर. त्या आईचं दु:ख तिलाच माहीत असतं. हरवणं वेगळं आणि जाणीवपूर्वक घरातून आपल्या माणसांना सोडून जाणं वेगळं. हरवलेल्या माणसांना शोधणं म्हणजे डोळ्यांत प्राण साठवून ठेवण्यासारखेच! पण घरातून निघून गेलेल्या माणसांना आपल्या माणसांपर्यंत येणं कठीण नसतं. हरवलेले सापडतात कधी कधी. पण सोडून गेलेली माणसं ही कायमची दु:खदायक बनून राहतात त्यांच्या माणसांसाठी!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -