Saturday, July 20, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सस्वातंत्र्यदिनाचे भाषण

स्वातंत्र्यदिनाचे भाषण

रमेश तांबे

आज विनूच्या शाळेत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला एक स्वातंत्र्यसैनिक येणार होते. त्यांना पाहण्यासाठी विनू खूपच अधीर झाला होता. मुख्य म्हणजे आज विनू आणि त्याचा मित्र समीर या दोघांची पाहुण्यांसमोर भाषणे होणार होती. विनूने स्वतःचे भाषण स्वतः तयार केले होते. विनूचा हा भाषणाचा पहिलाच प्रयत्न होता म्हणून त्याने गेले पंधरा दिवस कसून सराव केला होता. सकाळी सात वाजता शाळेत पोहोचायचे होते. सकाळी लवकर उठून शाळेचा गणवेश घालून विनू तयार झाला. तेवढ्यात त्याचा मित्र समीरदेखील आला अन् ते दोघेही लगेच शाळेत निघाले. रस्त्यात एका फेरीवाल्याकडून झेंडे विकत घेतले अन् आपल्या शर्टच्या डाव्या बाजूला व्यवस्थित लावले. विनूचा चेहरा आनंदाने अन् उत्साहाने फुलून गेला होता.

शाळा चांगलीच सजवली होती. मैदानात सर्वत्र पताका लावल्या होत्या. शाळेच्या व्हरांड्यात सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. स्पीकरवरून देशप्रेमाचा गजर करणारी गाणी सुरू होती. असंख्य मुलं-मुली अगदी नटून थटून आली होती. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणारी मुले तर आगळ्या-वेगळ्या वेषभूषेत आली होती. पहिली घंटा होताच सारी मुले रांगेत येऊन बसली. आजचे प्रमुख पाहुणे स्वातंत्र्यसैनिक माननीय चंद्रराव मालुसरे मुख्याध्यापकांसह व्यासपीठावर विराजमान झाले होते. मैदान मुलांनी अगदी भरून गेले होते. सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद अन् उत्साह दिसत होता. आता विनूला थोडी काळजी वाटू लागली. कारण विनू आणि त्याचा मित्र समीर यांची आज भाषणे होणार होती. त्या दोघांत समीर हा चांगला वक्ता होता, तर विनू पहिल्यांदाच व्यासपीठावरून बोलणार होता!

तेवढ्यात ‘एक साथ सावधान’चा आदेश पी.टी.च्या सरांनी दिला अन् दोनच मिनिटांत पाहुण्यांच्या हस्ते झेंडा वंदन झाले. नंतर शेकडो मुलांच्या मुखातून राष्ट्रगीत ऐकताना विनूची छाती अभिमानाने अन् डोळे पाण्याने भरून गेले. राष्ट्रगीत संपताच ‘भारतमाता की जय, वंदे मातरम’ असा घोष झाला. त्या घोषणांनी सारा परिसर निनादून गेला. विनूदेखील त्यात सामील झाला. या घोषणांमध्ये काहीतरी जादू नक्कीच आहे, हे विनूच्या लक्षात आले!

छान सजवलेल्या भव्य व्यासपीठावर पाहुणे बसले. मुख्याध्यापकांच्या हस्ते त्यांचा आदर सत्कार करण्यात आला अन् पहिले भाषण करण्यासाठी समीरचे नाव पुकारण्यात आले. इकडे विनूच्या छातीत धस्स झाले. आता यानंतर आपलाच नंबर आहे, हे आठवून त्याच्या तोंडाला कोरड पडू लागली. विनू आपले भाषण आठवू लागला. खिशातला कागद काढून पुनः पुन्हा वाचू लागला. पण त्याला कागदावरचे शब्ददेखील नीट दिसेनासे झाले होते. तितक्यात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. त्याने वर पाहिले, तर समीर भाषण संपवून रुबाबात खाली येत होता. इकडे विनू देवाचा धावा करू लागला. तोच विनय मधुसूदन देवस्थळी असे नाव पुकारले गेले!

नाव पुकारताच विनू उठला. आता त्याला कोणतेच भान उरले नव्हते. तो व्यासपीठावर गेला. समोरच्या प्रचंड गर्दीकडे बघितले अन् एक दीर्घ श्वास घेऊन त्याने घोषणा दिली, ‘भारतमाता की जय, वंदे मातरम्’ घोषणेला गर्दीतून प्रचंड प्रतिसाद मिळाला अन् विनू भानावर आला. त्याने पाहुण्यांकडे मोठ्या आत्मविश्वासाने बघत पहिले वाक्य उच्चारले, ‘स्वातंत्र्यसैनिकांना माझा मानाचा नमस्कार…! अन् पुढे दहा-बारा मिनिटे सारी भीती विसरून विनू बोलत राहिला. बोलता बोलता त्याने चारोळ्या, कविता, आठवणी यांची सुरेख पेरणी केली. विनूचे भाषण अगदी जोशपूर्ण, आवेशपूर्ण होते. भाषण सुरू असताना मधेच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता. शेवटी ‘भारतमातेच्या सेवेसाठी आपण सारे वचनबद्ध होऊ या’ असे म्हणत त्याने साऱ्या सभेला उभे केले अन् खड्या आवाजात शपथ म्हणवून घेतली. विनूचे भाषण संपले. टाळ्यांचा एकच गजर झाला. स्वतः स्वातंत्र्यसैनिक व्यासपीठावरून उठून विनूपर्यंत आले आणि त्याची पाठ त्यांनी थोपटली!

पुढे पाहुण्यांनी त्यांच्या भाषणात विनू अन् समीरच्या भाषणाचे कौतुक केले. विनूची तर त्यांनी भरभरून स्तुती केली. “अशा विचारांची भावी पिढी असेल, तर आपल्या देशाचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे” असे ते म्हणाले. कार्यक्रमानंतर अनेकांनी येऊन विनूचे अभिनंदन केले. मुख्याध्यापकांनीही साऱ्यांसमोर विनूचे तोंडभरून कौतुक केले. घरी येताना समीरने विनूला विचारले, “काय रे विनय तुझी तयारी नव्हती ना! अन् शिवाय तू पहिल्यांदाच व्यासपीठावरून बोलत होतास ना! मग काय झाले, असा चमत्कार कसा घडला? तू इतका छान कसा काय बोलू शकलास!” विनू म्हणाला, “मित्रा, ‘भारतमाता की जय’ या शब्दांची जादू आहे ती!”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -