।। जयाचे शिरी केशरी रंग शोभे,
दुजा पांढरा पाहता चित्त शोभे,
तिजा हिरवा शांती देई मनाला,
नमस्कार माझा तिरंगी ध्वजाला।।
मृणालिनी कुलकर्णी
१५ ऑगस्ट २०२२, आपण सारे स्वतंत्र ‘भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करीत आहोत. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्ययोद्ध्यांनी संघर्ष केला, बलिदान दिले त्यांना माझा प्रथमतः प्रणाम. ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणात मिळालेले स्वातंत्र्य. सव्वाशे कोटी देशवासीयांना सोबत घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सलग ७५ आठवडे साजरा केला जात आहे. या राष्ट्रीय उत्सवात लोकसहभाग महत्त्वाचा, कारण भारतातील तरुण पिढीला नव्हे संपूर्ण समाजाला, स्वातंत्र्याआधीचा आणि स्वातंत्र्यानंतरचा प्रवास कळवा. त्यासाठी मुख्य पाच थीम आखल्या आहेत. आपला देशाभिमान जागा व्हावा, यासाठी ‘मी भारतीय’ हे मनी ठसणे जरुरी आहे.
जेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रांत काही भारतीयांच्या योगदानामुळे भारताचा तिरंगा लहरतो, राष्ट्रगीताची धून वाजते तेव्हा ती दीड मिनिटे ‘मी भारतीय’ या नात्याने सर्वांचाच ऊर भरून येतो. हेच राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती…
भारत हा जगात सर्वात मोठा वांशिक आणि धार्मिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण देश आहे. भारताची संस्कृती खूप प्राचीन असून संत माहात्म्यांनी भारतीय संस्कृतीला आधीच खूप उच्च स्थानावर नेऊन ठेवले आहे. “सत्यमेव जयते” ये भारत का आदर्श वाक्य माना जाता है। ‘भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत,’ ही आपली प्रतिज्ञाच किती देशव्यापी आहे.
११ सप्टेंबर १८९३ या दिवशी स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत शिकागो येथे जागतिक सर्वधर्मीय परिषदेत, “अमेरिकेतील माझ्या बंधुभगिनींनो!”असे संबोधून मानव जातीबद्दल बंधुभाव प्रकट केला. यातून भारतीय संस्कृतीची, मूल्यांची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत हे कळते.
आपली संविधानावर कमालीची निष्ठा आहे. “सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य” ही सगळ्या जगात भारताची महत्त्वाची ओळख आहे. लोकशाही शब्दाचा अर्थ स्वातंत्र्य! स्वातंत्र्य! हे जगण्याचं एक सर्वोच्च मूल्य आहे. आज प्रत्येकाला स्वातंत्र्य हवे असते. भारताच्या या लोकशाही मूल्यामुळे प्रत्येक भारतीय, भारतात मुक्त आहे. अशा लोकशाही भारताचे आपण नागरिक आहोत म्हणून ‘मी भारतीय’ आहे, याचा मला अभिमान आहे.
संस्कृती म्हणजे समाज समूहात आढळणारे मानवाचे सामाजिक वर्तन! ‘स्वातंत्र्य, समता, बंधुत्व’ ही भारताच्या समाज संस्कृतीची मूल्य आहेत. देशाचे पूर्वीचे नाव ‘हिंदुस्थान’ असताना आपण ‘भारत’ स्वीकारले येथेच सर्वसामावेशक वृत्ती दिसून येते. ‘मेरा भारत महान’!
‘वसुधैव कुटुम्बकम्’ ये एक महत्त्वपूर्ण अपना संस्कृतीका मूल्य है। सारी धरती एक परिवार है। भारताच्या बहुवंशीय समाजात भाषा, संस्कृती, सण, पोशाख, खाद्य, चालीरिती, संगीत, नृत्य, भोजन यांचे स्तर विभिन्न असूनही आम्ही सारे एक आहोत. एकत्र येण्याने लोकांचा सामाजिक संबंध दीर्घकाळ टिकतो. संस्कृती जगण्याची कला शिकविते.
‘अतिथी देवो भव!’ दोन्ही हात जोडून नमस्कार करीत स्वागत करणे, इतरांना आपल्यात सामावून घेणे, एकमेकांचा आदर राखणे, मोठ्यांना नमस्कार करणे, एकत्र कुटुंबपद्धत, ही भारतीयांची वैशिट्ये होय!
साने गुरुजी म्हणतात, “ज्ञानाचा मागोवा घेत जे जे सत्य आहे, पवित्र (ईश्वरनिष्ठ) आहे, सुंदर आहे, ते घेऊन पुढे पुढे जाणारी, वाढवणारी “सत्यम शिवम सुंदरम!” ही भारतीय संस्कृती व्यापक असल्याने (आध्यत्म ते विज्ञान) नवा बदल स्वीकारते. लोकांमध्ये जवळीक निर्माण करते म्हणून भारतीय संस्कृती जगात प्रसिद्ध आहे. पतंजली! ५०००० वर्षांपूर्वी भारतात उगम झालेल्या योगाचा प्रसार आज जगात पसरला आहे.
भारतीय राज्याची संस्कृती – भारताचे राष्ट्रगीत “जन गण मन”मध्ये रवींद्रनाथांनी देशाच्या सांस्कृतिक मूल्यावर प्रकाश टाकला. भारतातील प्रत्येक राज्याची संस्कृती हे त्या प्रांताचे वैशिष्ट्य असते. ऋतुहवामानानुसार, स्थानिक शेतीनुसार, प्राकृतिक भूगोल यातून स्थानिक उत्पादन व्यवसायामधून प्रादेशिक सांस्कृतिक विविधता प्रतिबिंबित होते. प्रत्येकजण स्वतःच्या सण – उत्सवात पारंपरिक पोशाख, खाणे स्वीकारतात. भिन्न भाषा, भिन्न राहणीमान, भिन्न रीतिरिवाज तरी सारे एक दुसऱ्याचा सणात, प्रादेशिक महोत्सवात एकत्र सहभागी होऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण करतात. यातूनच आंतरजातीय, धर्मीय, प्रांतीय लग्ने होत आहेत.
प्रत्येक राज्यात सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे आहेत. प्रत्येक प्रांताचे खाद्य, पेहराव लोकांनी आवडीने स्वीकारला आहे. त्याचप्रमाणे त्या-त्या प्रांताचे वैशिट्यपूर्ण संगीत, नृत्य, शिल्पासह इतरही कलाविष्काराचा आस्वाद घेतात. प्रत्येक प्रांतांचे लोकजीवन, निसर्ग, प्राचीन वैशिट्ये वेगळी. पर्यटक म्हणून नव्हे, तर एक नागरिक म्हणून कितीजणांनी आपला भारत पाहिला? स्वच्छता, लोकसंख्या हे मोठे प्रश्न भारताच्या सुंदर वैविध्यतेला अडसर ठरतात.
समानतेच्या हक्कानुसार एकविसाव्या शतकात महिलांनी स्वतःला सिद्ध केलंय. कोरोनाच्या काळात आरोग्य खात्याने भारत सक्षमपणे सांभाळला. कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, अवकाश, संरक्षण साऱ्या क्षेत्रातल्या प्रगतीने जगाचे लक्ष भारताकडे वेधले गेले. ‘मेक इन इंडिया’ने भारतीय व्यवसायाला चालना मिळाली. भारतीय वस्तूची वाढती मागणी मेक इन इंडियाची ताकद आहे. ‘स्टार्ट अप’मुळे नवनिर्मिती झाली.
स्वातंत्र्यात राष्ट्राला ज्ञानाची, व्यासंगाची जोड असावी लागते. उभारत्या भारतासाठी डॉ. भूषण केळकर, बाबासाहेब आंबेडकर, होमी भाभा, अभय बंग हे सारे स्वदेशासाठी भारतात परतले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलेच आहे, ‘जरी उद्धरणी…’ माझ्या ज्ञानाचा उपयोग भारताला झाला पाहिजे. स्वातंत्र्याचा अर्थ स्वविकासात देशाची ओढ हवी. ‘भारत माता की जय’चा अर्थ भारतात नांदणाऱ्या भारतीयांचा जय! जय म्हणजे सुख, समृद्धी, आनंद.
जसजसा काळ पुढे सरकत आहे, तसतसा भारताच्या उभारणीचा रस्ता प्रशस्त होत आहे. शेवटी आझादी हीच देशाची ताकद आहे. आपला राष्ट्रध्वज तिरंगा सर्वांना एकत्र आणतो. हाच तिरंगा भारताचे भाग्य बदलण्याची प्रेरणा देतो.
।। जयाचे शिरी केशरी रंग शोभे, दुजा पांढरा पाहता चित्त शोभे, तिजा हिरवा शांती देई मनाला, नमस्कार माझा तिरंगी ध्वजाला।।
देशाला अभिमान वाटेल, असे कार्य करून ‘मी भारतीय’ हे स्वातंत्र्याचे मूल्य, सर्वांनी जगा आणि जागवा.