अनघा निकम-मगदूम
भारतीय स्वातंत्र्यसंग्रमाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना आणि उद्या देशाचा अभिमान असलेला झेंडा आपण फडकवणार असतानाच, आता आपल्या देश, राज्य आणि प्रदेशाची वाटचाल स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीकडे सुरू झाली आहे. पूर्वजांची पुण्याई, भारताला असलेली परंपरा आणि अनेक स्वातंत्र्ययोद्ध्यांमुळे, महापुरुषांमुळे आज आपण स्वतंत्र भारतात उभे आहोत. मात्र शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करताना प्रत्येक भारतीयाची जबाबदारी भारताला अधिकाधिक सक्षम करण्याची आहे. यासाठी आपला परिसर, गाव, प्रदेश सक्षम करणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला, तर रत्नागिरी जिल्ह्याला ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक, राजकीय इतिहास मोठा आहे. लोकमान्य टिळकांची ही जन्मभूमी तसेच भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही भूमी. तसेच ब्रिटिश सरकारने रत्नागिरी येथे बंदिवासात ठेवलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासारख्या महापुरुषामुळे रत्नागिरी जिल्हा पावन झाला आहे. स्वा. सावरकरांची ही कर्मभूमी आहे. या जिल्ह्याने आता प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली पाहिजे.
जिल्ह्यात १६७ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा आहे, ज्यामध्ये अनेक मनोरम्य किनारे व किल्ले आहेत. १८० कि.मी. सह्याद्री पर्वतरांगामध्ये डोंगर, डोंगरी किल्ले, वैविध्यपूर्ण वन्यजीवन आणि निसर्गरम्य सौंदर्य असणारी अनेक ठिकाणे आहेत. जल क्रीडा, नौकाविहार, मासेमारी, पोहोणे, कॅम्पिंगसाठी आदर्श खाड्यांनी समृद्ध आहे. येथील डोंगरदऱ्या, सागरी किनारे, खाडी, नद्या, गरम पाण्याचे झरे, जंगले, पाण्याचा साठा, धार्मिक ठिकाणे पर्यटकांना व यात्रेकरूंना मोठ्या प्रमाणात व दूरदूरून आकर्षित करतात. हापूस आंबे, काजू, कोकम, नारळ इत्यादी त्यांची गुणवत्ता आणि चवीसाठी प्रसिद्ध आहेत. कोकणी पाककृती, विशेषत: मासे, कोळंबी व समुद्री खाद्यपदार्थांचे मांसाहारी पदार्थ ही इथली खाद्यसंस्कृती आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा व सांगली जिल्हा व कोल्हापूर जिल्हा, तर उत्तरेस रायगड जिल्हा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काजळी, केव, गड, बोर, मुचकुंदी, वाशिष्टी, शास्त्री, सावित्री, जगबुडी या प्रमुख नद्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर, खेड, चिपळूण, मंडणगड, दापोली, रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर हे नऊ तालुके आहेत. रत्नागिरी ते कोल्हापूर (राष्ट्रीय महामार्ग २०४)आणि मुंबई ते कोचीन (राष्ट्रीय महामार्ग ६६) हे महामार्ग आहेत. जिल्ह्यातून कोकण रेल्वे जाते, तर विमानतळ असूनही ते प्रवासी वाहतूक केली जात नाही. तटरक्षक दलाकडून याचा वापर केला जातो.
आंबडवे हे रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील एक छोटे गाव आहे. आंबडवे हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव होय. येथे विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे, जे एक पंचतीर्थ आहे. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे, अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गुहागरमधील श्री व्याडेश्वराचे प्रसिद्ध मंदिर गुहागर शहरात आहे, तर एनरॉन कंपनी येथेच स्थापित झाली होती.
पावस हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीपासून अवघ्या २० कि.मी. अंतरावर आहे. सोहम साधनेचा पुरस्कार करून लोकोद्धार करणारे स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे गाव आहे. याशिवाय मार्लेश्वर, पूर्णगड, विविध किल्ले हे पर्यटनस्थळांमध्ये येतात. रत्नागिरी जिल्ह्यात आंबोळगड, गोपाळगड, गोविंदगड, जंगली जयगड, जयगड, पालगड, पूर्णगड, भवानीगड, महिपतगड, महीमंडणगड, यशवंतगड, रत्नदुर्ग, रसाळगड, विजयगड, सुवर्णदुर्ग हे गडकिल्ले आहेत.
रत्नागिरी जिल्हा हापूस आंब्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच काजू, नारळ, फणस, आमसूल (रातांबा) इत्यादींची लागवड येथे केली जाते. तांदळाची शेती येथे प्रामुख्याने केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (स्थापना : १८ मे १९७२) या जिल्ह्यात आहे. मात्र नैसर्गिक, भौगोलिक, सामाजिकदृष्ट्या संपन्न असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याला स्थलांतराचे ग्रहण लागले आहे. सन २०११ च्या जनगणनेमध्ये जिल्ह्याच्या लोकसंख्येत घट दिसून आली. अपुऱ्या रोजगार व्यवसायाच्या संधी, अविकसित कृषी क्षेत्र, मासेमारी, आंबा-काजू या नगदी पिकांचे क्षेत्र मूठभर लोकांकडे मर्यादित असणे, जिल्ह्याचे नियोजन करताना लोकप्रतिनिधींमध्ये नसलेली एकवाक्यता, दळण-वळणाच्या अपुऱ्या सेवा, मुबलक पाऊस पडूनही उन्हाळ्यातील पाण्याचे दुर्भीक्ष या आणि अशा अनेक कारणांमुळे जिल्ह्यात अपेक्षित विकास झालाच नाही.
आता मात्र एकीकडे देश महासत्ता होत असताना रत्नागिरीसारख्या प्रदेशाने विकासाच्या नव्या पाऊलवाटेवरून चालणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या या प्रदेशाने आता मागासपणाची जोखडे दूर करून, अनेक गोष्टींसाठी अन्य प्रदेशांवरील अवलंबित्व दूर करून स्वयंपूर्ण होणं आवश्यक आहे. हाच निर्धार या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…
मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…
नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…