(मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रदीप पटवर्धन यांचे मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यानिमित्त…)
प्रदीप म्हापसेकर
प्रदीप पटवर्धन म्हणजे पट्याबद्दल मला थोडसं लिहावंच लागेल, कारण गिरगावात पट्याला मी रोज पाहायचो. लॉकडाऊननंतर सकाळी आणि संध्याकाळी तो रोज नाक्यावर खुर्ची टाकून बसलेला असायचा. झावबा वाडीच्या गेटवर. तिथे सात-आठ जणांचा ग्रुप होता. पट्यापेक्षाही वयाने काही मोठे होते, पण पट्याला कायम खुर्ची मिळालेली असायची. पट्या एखाद्या राजासारखा त्या छोट्या खुर्चीवर बसलेला असायचा. माझाही घरी जाण्या-येण्याचा तोच रस्ता होता. त्यामुळे रोज हाय, हॅलो व्हायचं. पट्या अभिनेता कमी नि गिरगावकर जास्त वाटायचा इथे. पण त्याचा भारी कडक इस्त्री केलेला पांढरा शुभ्र शर्ट आणि पांढरे शूज काय ते वेगळे वाटायचे. कधी कधी तो ताड-ताड चालत त्याचे इस्त्री केलेले कपडे घेऊन जाताना दिसायचा. पट्या चांगला उंच होता. त्यामुळे तो झावबा वाडीत जाता-येताना उठून दिसायचा. पुन्हा इथेही त्याचे दिलखुलास हास्य असायचे. मला नवल वाटायचं, पट्या पूर्वी स्टेजवर सिनेमात धुडगूस घालायचा, पण इथे तो नाक्यावर कमालीचा शांत कसा काय बसलेला असायचा.
पट्याला मी पहिल्यांदा टीव्हीवर पाहिले होते. पंचवीसएक वर्षांपूर्वी ‘आठशे खिडक्या नवशे दारं…’ या गाण्यावर नाचताना पाहिलं होत. ते गाणंही पुढे हिट झालं आणि पट्याही फेमस झाला. पट्याची मी काही नाटकं पहिली नाहीत. अगदी गाजलेलं ‘मोरूची मावशी’पण पाहिलं नाही. गिरगावात पट्याबद्दल खूप ऐकलं होतं. पूर्वी इकडे त्याचा खूप गाजावाजा होता. तो यासाठी की तो दहीहंडीला बेफाम मस्त नाचायचा. खूप बायका, पोरी त्याच्या त्या डान्सवर खूश होत्या म्हणे. इतर डान्स करणारे आपला डान्स थांबवून त्याचा डान्स बघत राहायचे. त्याच्याबद्दल खूप काही ऐकायला मिळायचं. गिरगावात याने एकेकाळी काय धमाल केली असेल, हे सांगायला नको. आधीच इथे सण जोरात साजरे होतात. अलीकडे गुढीपाडव्याला इथली पोर-पोरी नटून थटून बाहेर पडतात. पट्या त्यांना पाहून गालातल्या गालात हसत असेल. पट्या सच्चा मुंबईकर आणि पक्का गिरगावकर होता. नाटक, सिनेमा करून तो गिरगावात कधी भाव खाताना दिसला नाही. कायम जमिनीवर राहिला. बऱ्याच वर्षांतून मी फक्त एकदाच हो एकदाच त्याला पॉश गाडीतून जाताना पाहिलं.
दोनेक वर्षांपूर्वी मी पट्याला एक फोटो दाखवला होता. वीसएक वर्षांपूर्वी बहुतेक परळला मालवणी जत्रा भरली होती. कोकणातल्या विविध गोष्टी इथे विक्रीला होत्या. इथेच तिथल्या आयोजकांनी माझ्या व्यंगचित्रांचं छोटंसं प्रदर्शन भरवलं होतं. विषय अर्थात कोकणी माणूस आणि कोकण असा होता. रोज इथे एक सेलिब्रिटी यायचा. तो त्या दिवसाचा स्टार असायचा. सगळ्या स्टॉलला भेट देऊन आणि भाषण वगैरे करून जायचा. अर्थात ते माझी व्यंगचित्रेही पाहत. पट्याचा एक दिवस होता त्यातला. पट्या माझी चित्र पाहतानाचा फोटो मी त्याला बऱ्याच वर्षांनी दाखवला. पट्या इतकंच म्हणाला, “आयला मी इतका बारीक होतो.” झावबा वाडीच्या नाक्यावर पट्या त्या ग्रुपमध्ये कसली चर्चा करत असेल, याचं मला नेहमी कुतूहल होतं.
गल्लीत कधी मी कांदे-बटाटे घेत असताना बाजूला कुणी तरी भाजीवाल्याला म्हणत असतो, “एक किलो टोमॅटो नंतर घरी पाठव.” हा आवाज पट्याचा असतो. तीनेक महिन्यांपूर्वी मी त्याला इतकंच म्हटलं, “मुलाखत मस्त झाली.”
पट्या म्हणाला, “दूरदर्शनवरची ना… विक्रम गोखलेंनी घेतलेली ना…!”
मी प्रथम पट्याला टीव्हीवर पाहिलं, पण नंतर खराखुरा वीसेक वर्षांपूर्वी पहिला. मी रोज चर्नी रोडला ट्रेनमधून उतरायचो. एकदा उतरताना दरवाजावर हा माझ्यापुढे उभा होता. ट्रेन थांबण्याआधीच त्याने चटकन उडी मारली. मी पाठीमागून त्याला बघतच होतो आणि पट्या चटकन पलीकडच्या ट्रॅकवर उडी मारून पुन्हा एखाद्या सराईत कसरतपटूसारखा पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर चढतो आणि तिथून तो सहजपणे बाहेर रस्त्यावर जातोही. त्याचा हा शॉर्टकट पाहून मी अवाक झालो होतो. पट्या कदाचित कलाकार कमी आणि टपोरी जास्त असावा त्याकाळी. त्यावेळी माझ्या एका मित्राला मी म्हणालो होतो, “प्रदीप पटवर्धन असं कसं करू शकतो. लोक काय म्हणतील.”
काल-परवा मी त्याला नाक्यावर हात दाखवला होता आणि आज सकाळी ही अशी धक्कादायक बातमी. पूर्वी जसा तो प्लॅटफॉर्मवरून गायब झाला होता, तसाच आज तो आपल्यातून गायब झाला. नाक्यावरून जाताना पट्या रोजच आठवेल. त्याचा ग्रुप रोज दिसेल, पण तो रुबाबदार खुर्चीवर बसलेला पट्या कधीच दिसणार नाही.