Wednesday, July 17, 2024
Homeमनोरंजन‘दे धक्का २’ घालतोय धुमाकूळ

‘दे धक्का २’ घालतोय धुमाकूळ

दीपक परब

ख्यातनाम निर्माते – दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या २००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दे धक्का’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात आजही रुंजी घालतोय व तो आवडीने पाहिला जातो. आता १४ वर्षांनंतर या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘दे धक्का २’ हा सिनेमा ५ ऑगस्टला प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेक सिनेमागृहांबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकत आहे. त्यामुळे आनंदित झालेल्या सिद्धार्थ जाधवने नुकताच याबाबतचा एक व्हीडिओ शेअर केला असून महाराष्ट्रभर ‘दे धक्का २’ प्रदर्शित झाला आणि धिंगाणा घालणारा प्रतिसाद पाहायला मिळतोय. धिंगाणा ऑडियन्स आहे, धिंगाणा पब्लिक आहे, धिंगाणा रिसपॉन्स आहे’ असे म्हटले आहे. सिद्धार्थचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

‘दे धक्का २’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळली आहे. अमेय खोपकर यांच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये करण्यात आले असून या सिनेमात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. ‘दे धक्का’ हा चित्रपट २००८ साली चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. अनेकदा चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागलेले दिसून आले होते. ‘दे धक्का’मध्ये शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर, गौरी वैद्य, सचित पाटील या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाचा पहिला भाग अतुल काळे आणि सुदेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केला होता; तर महेश मांजरेकरांनी या चित्रपटाचे लेखन केले होते. ‘दे धक्का २’ मधील गाणी देखील प्रदर्शित झाली आहेत.

श्रृती मराठेचे निर्मिती क्षेत्रात पाऊल

 

श्रृतीने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत तिच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. ऑन स्क्रीन प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी श्रृती आता पडद्यामागे मोठी व महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार असून तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. अभिनेत्री श्रृती मराठेने अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच कलाविश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘सनई चौघडे’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘बंध नायलॉनचे’, ‘शुभ लग्न सावधान’ अशा अनेक चित्रपटांतून श्रृतीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. विशेष म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही श्रृतीने काम केले आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत ती ‘श्रृती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे. सिनेमांसोबत मालिका आणि जाहिरांतीमध्ये अभिनय करून श्रृतीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. आता श्रृतीने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत तिच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. श्रुती आणि तिचा पती गौरव घाटणेकर मिळून झी मराठी वाहिनीवरील एका मालिकेची निर्मिती करत आहेत. गौरव हादेखील एक उत्तम अभिनेता आहे. अभिनयाबरोबरच तो निर्माताही आहे. ‘ब्लॅक कॉफी प्रोडक्शन’ ही त्याची निर्मिती कंपनी आहे. झी मराठीवरील नव्याने सुरू होणारी ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेची निर्मिती श्रृती आणि गौरव करत आहेत. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली असून हळूहळू प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत आहे. श्रृतीच्या या नव्या वाटचालीसाठी चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छाही दिल्या आहेत.

तेजस्वी प्रकाश झळकणार मराठी चित्रपटात

 

करण कुंद्रासोबतच्या नात्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारी तेजस्वी प्रकाश हिच्याबद्दल एक मोठी बातमी पुढे आली असून ही अभिनेत्री लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार असून ‘मन कस्तुरी रे’ या मराठी चित्रपटातून तेजस्वी पदार्पण करत आहे. या बातमीने तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

तेजस्वीच्या पहिल्या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. तेजस्वीने तिच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये तिच्यासोबत मराठी अभिनेता अभिनय बेर्डे दिसत आहे. पोस्टरमध्ये दोघेही एकत्र स्कूटरवर जाताना दिसत आहेत. तेजस्वी खूप आनंदी आणि मजेत दिसत असून हे दोघेही स्कूटरवरून तोल सांभाळत जाताना दिसत आहेत. तेजस्वीचे चाहते तिचा हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -