चिपळूण (प्रतिनिधी) : अतिवृष्टी, महापूर काळात विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने टेलिफोन व मोबाइल यंत्रणा ठप्प होत असल्याने लोकांपर्यंत आपत्तीबाबतचे संदेश अथवा सूचना पोहोचत नाहीत. परिणामी जीवितहानीसह प्रचंड वित्तहानीला सामोरे जावे लागते. याचाच विचार करून येथील नगरपालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत बॅटरी सेलवर चालणारे हॅण्डी मेगाफोन खरेदी केले असून ते पथक प्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे आता वीजपुरवठा गायब असला तरीही या यंत्रणेद्वारे नागरिकांना वेळीच सतर्क केले जाणार आहे. या यंत्रणेत आपत्तीचा संदेश देणे आणि सायरन वाजणे या दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत.
गत वर्षीच्या महापुराचे अनुभव पाठीशी असल्याने या वर्षीच्या पावसाळयात नगरपालिका प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने गेल्या वर्षी टेलिफोन, मोबाइल यंत्रणा ठप्प झाली होती. या वर्षीच्या पावसाळ्यात तशा प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी पालिका प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले. आपत्तीबाबतची माहिती व सूचना तात्काळ नागरिकांपर्यंत कशा पोहोचतील व त्यांना सतर्क करता येईल या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले आहे.
त्यानुसार प्रशासनाने दिलेले पब्लिक ऍड्रेस सिस्टीम शहरातील मुख्य भागांमध्ये बसविण्यात आली आहे. याशिवाय वॉकी टॉकी हेसुद्धा खरेदी केले आहेत. या जोडीला आता हॅण्डी मेगाफोनही खरेदी केले असून ते सर्व पथक प्रमुखांना वाटप करण्यात आले आहेत. या यंत्रणेच्या वापराचे ट्रेनिंग सर्वांना खेर्डी येथील हरी ईलेट्रॉनिक्स यांच्यामार्फत दिले आहे. त्याचबरोबर आवश्यक असलेल्या ठिकाणी मदत कार्याची बोट पोहोच व्हावी, यासाठी बोट गाडाही खरेदी करण्यात आला आहे. त्यामुळे बोट उचलणे, वाहून नेणे आणि तिथे उतरणे यासाठी आता केवळ १-२ कर्मचारी पुरेसे आहेत. हा गाडा दुचाकीच्या मागे लावूनही ओढून नेता येतो.