माधवी घारपुरे
डॉ. चासे आपल्या मित्राकडे (पेशंटकडे) त्याच्या मुलाच्या बर्थ डे पार्टीसाठी तयार झाले. महिन्यांनी झब्बा, कुर्ता, जाकीट या वेषांत त्यांना तयार झालेले पाहून पत्नीपण आश्चर्यचकित झाली. गाडी पार्क करून जांभळे यांच्या सदानंद बंगल्यात डॉक्टरांनी प्रवेश केला. इतका सुंदर बंगला त्यांना अपेक्षित नव्हता. पण त्यांच्या चेहऱ्यावरून ते भाव सरकून गेले. यालाच म्हणतात मानवी मन!
डॉ. चासे यांना तिथे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण डॉक्टरांची भ्रमंती भारतभर झाली होती. ‘वन ऑफ द बेस्ट सर्जन इन इंडिया’ असे मानत होते. जे सत्य होतं. लोकांच्या डोळ्यांतले ते भाव बघून आतल्या आत डॉक्टर सुखावले आणि जांभळे यांची कॉलर पण ताठ झाली.
हाय, हॅलो झालं, सॉफ्ट ड्रिंक झालं. जांभळेंच्या किशोरनं केक कापला. पहिला तुकडा त्याने डॉक्टरांच्या मुखात घातला. ते म्हणाले, “अरे तुझ्या बाबांना, आईला दे आधी!”
जांभळ्यांनीच उत्तर दिलं. “नाही नाही किशोरने बरोबरच केलंय तुम्ही नसता, तर आम्ही वाढदिवस करूच शकलो नसतो.”
“मित्रहो तुम्हाला माहीत आहेच की, गेल्या वर्षी अचानक किशोरला हार्ट ट्रबलर होऊ लागला. शेवटी निदान झालं की, त्याच्या हार्टमधील एक व्हॉल्ट बदलण्याशिवाय पर्याय नाही. डॉक्टरांची अपॉइंटमेंट मोठ्या मुश्किलीने मिळाली. ऑपरेशनही लगेच झाले आणि आज हा किशोर डॉक्टरांमुळे तुमच्यापुढे खणखणीत उभा आहे.”
“आता घरच्यांच्या ओळखी तरी करून घ्या.” जांभळ्यांनी आई, पत्नी, बहीण, सगळ्यांच्या ओळखी करून दिल्या आणि म्हणाला, “अरे महत्त्वाचा माणूस राहिला, दादा कुठं गेला?”
“भाऊजी ना! काहीतरी आणायला गेलेत.” पत्नी म्हणाली.
“असू दे… असू दे” डॉक्टर म्हणाले. त्यांनाही तितपतच इंटरेस्ट होता.
जो तो पांगला. बुफेकडे वळला. इतक्यात जांभळ्यांना ऐकू आलं, “ओ माय गॉड!”
“काय झालं सर?” जांभळ्यांनी घाबरून विचारलं.
“जांभळे, अहो माझ्या मोजडीचा सोल निघाला. किती महिन्यांनी हा ड्रेस केला, नेमका घात झाला. मी अनवाणी कसा फिरणार? कसं दिसेल ते?”
“डॉक्टर लगेच काम होईल. आमचा दादा आहे ना?” “ते काय चपला शिवतात? काय बोलताय?” तोपर्यंत सदानंद, जांभळ्यांचा दादा आला.
“हे बघा आला. मघाशी नव्हता. माझे वडील म्हणा ना. याचा लेंगा, शर्ट, टोपी पाहून वाटतो तसा नाहीये तो. याची चपला, बुटांची फॅक्टरी आहे मोठी सोलापूरला. बडी आसामी आहे. वडील एका अपघातात मृत्युमुखी पडले. सगळा भार दादावर आला. त्यात दहावीला ८५ टक्के मार्क मिळाले. पण त्याने माझ्यासाठी, ताईसाठी स्वत:चे शिक्षण सोडले आणि धंद्याला लागला. घर सावरू लागले. मुळातच हुशार असल्याने अभ्यासाने, सरावाने एक एक पाऊल उचलत उचलत धंदा वाढवला. रस्त्यावरून टपरी, मग छोटं दुकान, छोटी फॅक्टरी करता करता मोठा फॅक्टरी मॅन झाला, पण आपण ‘मोठं’ नाही, याचं भान ठेवण्यासाठी आठवड्यातून एक दिवस तो टपरीवर स्वत: बसतो. जाईल तिथं दोन तीन हत्यारं ठेवतो. तो आता मोजडीही नीट करून देईल.”
डॉक्टरांचा चेहरा उतरत होता. पण टेच तोच! “सर, ऐकताय ना, महत्त्वाचे म्हणजे याच्यामुळे आम्ही (मी आणि ताई) उच्चशिक्षित झालो म्हणून माझ्या बंगल्याचं नावही मी ‘सदानंद ’ ठेवले. अरे दादा तू जरी…”
“अरे वेड्या मोजडीचं बोलतोयस ना? मी आहे ना! करतो ना नीट! अरे अशा जगप्रसिद्ध माणसाच्या, ज्याने माझ्या पुतण्याला जीवदान दिले. त्याच्या मोजड्या माझ्यासाठी ‘पादुका’ आहेत.”
डॉक्टरना घेऊन दादा आत गेला. पिशवीतून दोरा, सुई आणि आवश्यक सामान काढून बरोबर ५ मिनिटांत मोजडी तयार!
“दादा तुमच्याबद्दल काय बोलू?” डॉक्टर थांबत थांबत बोलतानाच… “काही बोलू नका, मला एकच माहिती आहे की, आपण माणसं आहोत. मला मोठा-छोटा असं काही वाटत नाही.”
“आलो २ मिनिटांत, म्हणून डॉक्टर वॉशरूमकडे गेले. आत गेल्यावर त्यांनी भरलेले डोळे रुमालानं पुसले. चेहरा स्वच्छ केला आणि आरशासमोर उभे राहून मनाला म्हणाले, “मी आणि ते दादा काय फरक? दोघेही कातड्याशीच संबंधित. मी कातडंच शिवतो, तो पण तेच. फक्त मी माणसाचं कातडं शिवतो, तो मेलेलं कातडं शिवतो. त्याबद्दल दोघे पैसे मोठ्या फरकात घेतो. पण वेळेला मी जितका महत्त्वाचा तसा तोही वेळेला महत्त्वाचा!”
“डोक्यातून मोठा आणि छोटा फरक गेलाच पाहिजे.” असं म्हणून स्वच्छ मनानं डॉक्टर बाहेर आले आणि सदानंदरावांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले,“चला दादा, जेवायला घेऊ या”