कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरून प्रवाशांना सेवा देणारे आणखीन एक विमान असावे, अशी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी केलेली मागणी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पूर्ण केली आहे.
एअरलाइन्सच्या आणखीन एका विमानाला मुंबई ते चिपी व चिपी विमानतळावरून पुन्हा मुंबई अशा सायंकाळच्या सत्रातील प्रवासाला मंजुरी दिली आहे. आमदार नितेश राणे यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे एका दिवसात दोन विमानांची सेवा सिंधुदुर्गवासीयांना मिळणार आहे. ही विमान सेवा १८ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत स्वतः आमदार नितेश राणे यांनी दिली.
चिपी विमानतळावर १८ ऑगस्टपासून दुसरे विमान सुरू करण्यास केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मान्यता दिली आहे. यात १८ ऑगस्टपासून सायंकाळी ३ वाजता मुंबई हुन हे विमान सुटेल आणि ४.२० वाजता ते विमान सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर लँडिंग होईल, तर पुन्हा सायंकाळी ४.४५ वाजता ते विमान चीपी विमानतळ येथून टेक ऑफ होऊन ६.२० वाजता मुंबईला लँडिंग होणार आहे.
हे विमान एका वेळी सत्तर प्रवाशांची ने-आण करणार आहे. गणेश चतुर्थीसाठी, कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना ही एक सुवर्णसंधी देण्यात आली असून, चाकरमान्यांनी देखील या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे. तूर्तास गणेशोत्सवासाठी ही नवीन विमान सेवा सुरू केले आहे; परंतु येत्या काळात ही विमान सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
दरम्यान आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, त्याचप्रमाणे एअरलाइन्सचे विरेंद्र म्हैसकर, किरण तसेच मुंबईत हे स्पेशल विमान पार्किंग करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल अदानी कंपनी आणि त्यांचे डायरेक्टर, व अधिकारी या सर्वांचे आमदार नितेश राणे यांनी आभार मानले आहे. सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी ही विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.