मुंबई : सलग चार दिवस सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. सलग सुट्ट्यांमुळे मुंबईहून पर्यटनासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. याचा थेट परिणाम एक्स्प्रेसवेवरच्या वाहतूकीला झाल्याचे पाहायला मिळाले. खालापूर टोल नाक्याजवळ सुमारे दोन ते अडीच किलोमीटर लांब वाहनांची रांग लागली.
शनिवार-रविवारची सुट्टी आणि त्यानंतर स्वातंत्र्यदिन आणि पारशी नवीन वर्ष अशा चार सुट्ट्या लागून आल्याने मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे पुण्याकडे तसेच इतर पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
एक्स्प्रेसवेवर अवजड वाहनांची संख्या जास्त असते त्यामुळे आधीच रस्त्यांवर वाहतूक मंद झालेली असते. त्यात आता सलग सुट्ट्या आल्याने त्यात भर पडली आहे. पुण्याच्या सभोवताली असंख्य पर्यटनस्थळे आहेत. त्याकडे पर्यटकांचा ओढा असतो. सध्या पावसाळी वातावरण आहे. त्यात सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने ही पर्यटकांसाठी चांगली पर्वणी ठरली आहे.