वाडा (वार्ताहर) : वाडा शहरातील अशोकवन भागातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण झाल्याची घटना शुक्रवार (१२ ऑगस्ट) रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेचा तपास वाडा पोलिसांनी अवघ्या १२ तासाच्या आत लावल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तर तातडीने मुलीची सुरक्षित सुटका करणाऱ्या वाडा पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याप्रकरणी समीर श्याम ठाकरे (वय -३०) रा. ऐनशेत या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सदर मुलगी ही वाडा येथील पी.जे. हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिकत असून शुक्रवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर ही मुलगी आपल्या दोन मैत्रिणीसोबत घरी येत होती. तिच्या मैत्रिणी घरी गेल्यानंतर ही मुलगी अशोक वनातील बिल्डिंग मधील तिच्या घरी जात असताना, सायंकाळी ६च्या सुमारास बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तींकडून तीला कारमध्ये बसवून पळविण्यात आले. या दरम्यान सदरची मुलगी जोरात ओरडल्याने काहीतरी विपरीत घडल्याचे काही रहिवाशांच्या लक्षात आले, मात्र तो पर्यंत अपहरणकर्ते मुलीला घेवून पसार झाले होते.
या प्रकरणी वाडा पोलिसांनी रात्रभर तपास करून वाडा शहरातील सी सी टिव्ही फुटेज तपासले असता, या फुटेजमध्ये एक पांढऱ्या रंगाची संशयास्पद स्विफ्ट कार आढळून आली. पोलिसांनी टेक्निकल बाबींचा आधार घेवून योग्य दिशेने तपास करून आरोपींना अवघ्या १२ तासांच्या आत अटक करुन सदर मुलीची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुरक्षित सुटका केली. याबद्दल पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी वाडा पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे. तसेच तालुक्यातील नागरिकांकडूनही पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाडा पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने या गुन्ह्याचा तपास यशस्वीपणे केला आहे.
सदर मुलीचे आई वडील हे मूळ विक्रमगड तालुक्यातील असून प्राथमिक शिक्षक आहेत. तर ते अनेक वर्षांपासून वाड्यातील अशोकवन भागात राहत आहेत. सदरचा अशोकवन हा परिसर वाडा पोलीस स्टेशन लगत असून सदरची घटना वाडा पोलीस स्टेशन परिसरातच घडल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र या गुन्ह्याचा उलगडा पोलिसांनी तातडीने केल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.