Thursday, March 20, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरगणेशोत्सवासाठी वसई-विरार पालिकेची ‘एक खिडकी’ योजना!

गणेशोत्सवासाठी वसई-विरार पालिकेची ‘एक खिडकी’ योजना!

विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीमध्ये या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना, महानगरपालिकेमार्फत नावीन्यपूरक उपक्रम हाती घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या वर्षी मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगीबाबत ‘एक खिडकी कक्ष’ योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून गणेशोत्सव मंडळांना सर्व विभागाच्या परवानगीसाठी वेगवेगळ्या कार्यालयांत जाऊन स्वतंत्र अर्ज करण्याऐवजी महापालिकेमार्फत तयार करण्यात आलेल्या एक खिडकी कक्षामध्ये अर्ज करता येणार आहे.

या योजनेमुळे गणेशोत्सव मंडळांना कमीतकमी वेळेत सर्व परवानग्या एका छताखाली मिळणार आहेत. तसेच या वर्षीपासून महानगरपालिकेमार्फत सदर परवानगीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. महापालिकामार्फत एक पोर्टल अॅपद्वारे सदरची सुविधा देण्यात येईल. सर्व गणेशोत्सव मंडळ यांनी https://pandal.vvcmcharghartiranga.in या लिंकद्वारे अथवा क्यूआर कोडद्वारे लॉगिन केल्यानंतर सदर पोर्टलवरवर गणेशोत्सव मंडळांच्या अर्जाची नोंदणी केली जाईल. तद्नंतर सदर अर्जाची महानगरपालिकेमार्फत प्राथमिक तपासणी करून संबंधित इतर विभाग जसे पोलीस विभाग, वाहतूक नियंत्रण शाखा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व अग्निशमन विभाग यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पोर्टलद्वारे पाठविला जाणार आहे.

संबंधित विभागाकडून या बाबत आवश्यक ती तपासणी, शहानिशा करुन त्यांच्याकडील परवानगी-ना हरकत प्रमाणपत्र पोर्टलवर सबमिट केले जाणार आहे. सर्व विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेमार्फत संबंधित अर्जदार, गणेशोत्सव मंडळ यांना ऑनलाइन पोर्टलद्वारे परवानगी दिली जाईल. ही संपूर्ण प्रक्रियाही ऑनलाइन स्वरूपाची आल्यामुळे गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही विभागाकडे वारंवार हेलपाटे मारण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांचे श्रम व वेळ दोन्हींची बचत होणार आहे. सदर परवानगी प्रक्रियेसाठी हे प्रथम वर्ष असल्यामुळे संबंधित एक खिडकी कक्षामध्ये गणेशोत्सव मंडळांना सदरचा अर्ज भरताना मार्गदर्शन, मदत करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत कार्यालयीन अधीक्षक व संगणक ऑपरेटर कार्यालयीन वेळेत उपस्थित असतील. महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभाग समिती स्तरावर सदरची एक खिडकी कक्ष तयार करण्यात आलेले आहेत. तरी सर्व गणेशोत्सव मंडळांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -