कोल्हापूर : शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी काही शिवसैनिकांचीही धरपकड केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या वेळी निदर्शने करणार असल्याची घोषणा कोल्हापूर शिवसेनेने केली होती. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून संजय पवार यांना ताब्यात घेतले आहे.
बंडखोर आमदार आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात येणार होती. ही निदर्शने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार होती. मात्र, त्यापूर्वीच शिवसैनिकांची धरपकड पोलिसांनी सुरू केली.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे एक पथक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या निवासस्थानी धडकले. आम्ही लोकशाही मार्गाने निदर्शने करणार होतो. लोकशाहीमध्ये आम्हाला तेवढा अधिकार नाही का, असा प्रश्न पवार यांनी केला. ही कारवाई कोणाला खूष करण्यासाठी सुरू आहे, असा सवाल पवार यांनी पोलिसांनी केला. यावेळी संजय पवार यांनी संजय राठोड यांच्याविरोधात आरोप करणारे आज गप्प का आहेत, असा सवाल केला. किरीट सोमय्या, चित्रा वाघ हे संजय राठोड यांच्याविरोधात होते. आता मंत्रिमंडळात राठोड यांचा समावेश झाल्यानंतर मूग गिळून का गप्प आहेत, असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला.
दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या गाडीसमोर शिवसैनिकांनी ठिय्या मांडला. संजय पवार यांच्यावर झालेली कारवाई चुकीची आणि दडपशाही करणारी असल्याचे शिवसैनिकांनी म्हटले. शिवसैनिकांना पोलिसांकडून बाजूला घेण्याची कारवाई सुरू झाली. त्यावेळी पवार हे स्वत: पोलिसांच्या कारमधून उतरले आणि शिवसैनिकांना शांततेचे आवाहन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर आणि सांगलीत अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा ठिकाणी भेट देऊन तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, सांगलीतल्या खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचं काही दिवसापूर्वी निधन झाले होते. मुख्यमंत्री अनिल बाबर यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी देखील भेट देणार आहेत. गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली आहे. त्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच पूर पाहणी दौरा आहे.