भाईंदर (वार्ताहर) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील घोडबंदर किल्ला व जंजिरे धारावी किल्ल्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी बससेवा उपलब्ध करून नागरिकांना पर्यटन घडवून आणण्याचा उपक्रम १५ ऑगस्टला महापालिका राबविणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. या निमित्ताने मीरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रमातर्फे शहरातील ऐतिहासिक घोडबंदर किल्ला व जंजिरे धारावी किल्ला पर्यटकांना पाहता यावा यासाठी महापौर ज्योत्स्ना हसनाळे आणि आयुक्त दिलीप ढोले यांचे निर्देशानुसार मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
१५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता गोल्डन नेस्ट चौक भाईंदर (पू.) येथून एक बस घोडबंदर किल्ला व दुसरी बस जंजिरे धारावी किल्ल्यासाठी सोडण्यात येईल. घोडबंदर किल्ल्यासाठी पाठविलेली बस घोडबंदर किल्ला पाहून झाल्यानंतर धारावी किल्ल्याकडे रवाना होईल व जंजिरे धारावी किल्ल्यासाठी पाठविलेली बस पुढे घोडबंदर किल्ल्यासाठी रवाना होईल. दोन्ही किल्ले पाहून झाल्यानंतर पर्यटकांना पुन्हा गोल्डन नेस्ट चौक येथे सोडण्यात येईल. सदर दोन्ही बसची दुसरी फेरी दुपारी २.३० वाजता गोल्डन नेस्ट चौक येथून सोडण्यात येईल.
शहरातील पर्यटकांनी सदर विशेष बसचा लाभ घेऊन दोन्ही ऐतिहासीक किल्ल्यांना भेटी द्याव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे.