मुंबई : आपल्याकडे आता अडीच वर्षांचा कालावधी आहे, त्यामुळे या काळात पाच वर्षांची काम करायची आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभात फडणवीस कार्यकर्त्यांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले, आता आपले सरकार आले आहे. एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री आहेत, मी उपमुख्यंत्री आहे. आपल्याकडील अडीच वर्षे निघून गेली आहेत. आता पुढील अडीच वर्षात पाच वर्षांची धाव आपल्याला घ्यायची आहे. तसेच महाराष्ट्राची जी घडी विस्कळीत झाली होती. ज्या महाराष्ट्रात भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचारांची मालिका सुरु झाली होती. ती मालिका थांबवून पुन्हा एकदा महाराष्ट्राला ट्रॅकवर आणून वेगाने तो धावला पाहिजे, हा प्रयत्न आपला आहे.
मागच्या काळात शेतकऱ्यांवर आपत्ती आली तरी सरकार घोषणा करायचे पण पैसे देत नव्हते. पण आपल्या सरकारने एनडीआरएफच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय आपण घेतला. आपले सरकार आलेले आहे. आता सर्व अन्याय दूर करायचे आहेत. बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपचा मोठा विस्तार होईल, असा विश्वासही फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला. बावनकुळे हे ऊर्जामंत्री असताना त्यांनी या खात्याला न्याय दिला होता. आता प्रदेशाध्यक्षपदाला ते न्याय देतील, असेही ते म्हणाले.