मुंबई : एनसीबीचे माजी विभागीय संचालक आणि चेन्नईत डीजीसीआयपदी असलेले समीर वानखेडे यांना विभागीय जात पडताळणी समितीने क्लिनचीट दिली आहे. तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या.
ते जन्माने मुस्लिम नाहीत, त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे हे अनुसुचित जातीत मोडतात, दोघांनीही मुस्लिम धर्मात प्रवेश केला ही बाबही सिद्ध होत नाही, असा निर्वाळा विभागीय जात पडताळणी समितीने दिला.
समीर वानखेडे हे हिंदू नसून मुस्लिम असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांनी काही बनावट कारवाया केल्या, असाही मलिकांचा आरोप होता. समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाचे काही फोटो सुद्धा जाहीर केले होते. समीर वानखेडे यांचा आधी निकाह झाला होता असा आरोपही केला होता.
समीर वानखेडे यांचे कुटुंब मूळचे महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील आहे. रिसोड तालुक्यातील भरुणतोफा हे गाव वानखेडेंच मूळ गाव आहे. ऑगस्ट २०२० मध्ये समीर वानखेडे यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाचे संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला. त्याच वर्षी वानखेडे यांना केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे उत्कृष्ठ तपासासाठीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यानंतर क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात आयर्न खान याचे नाव आल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले. त्यांनीच ही कारवाई केली होती. या कारवाईनंतर अनेक टीकाही झाल्या होत्या. त्यानंतर नवाब मलिकांनीही त्यांना लक्ष्य केले होते.