नाशिक (प्रतिनिधी) : महानगरपालिका, आर्टिलरी सेंटर आणि सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचे दर्शन करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन आजपासून तीन दिवस करण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ऑगस्टपासून विविध उपक्रम महापालिकेतर्फे पार पडत आहेत. नाशिक महानगरपालिका, आर्टिलरी सेंटर, युनायटेड वुई स्टॅण्ड फाऊंडेशन आणि सिटी सेंटर मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने युद्धात वापरल्या गेलेल्या आणि वापरल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांचे म्हणजे तोफा आणि दारूगोळा, विविध प्रकारच्या रायफल आणि बंदुकाचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. शहरातील सिटी सेंटर मॉल येथे १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अतिरीक्त आयुक्त सुरेश खाडे, उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर, युनायटेड वुई स्टॅण्ड फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर मटाले, नाशिक रोड येथील आर्टिलरी सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर ए. राजेश, सिटी सेंटर मॉलचे जनरल मॅनेजर पराग सिंग राठोड, मार्केटिंग मॅनेजर सुप्रीया अरोरा या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
भारतीय लष्कराचे सामर्थ्य या शस्त्रास्त्र प्रदर्शनातून दिसून येत आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी मिलिटरी बँण्डचे वादन करण्यात येणार आहे. यावेळी युनायटेड वुई स्टॅण्ड फाऊंडेशन सदस्य ओम काटे, निलेश पवार, हरीश्चंद्र सिंग, गुरु सिंग, अनिमेश दास, गौरव राहाणे, अंकुश चव्हाण, हिंमाशू सूर्यवंशी, पियूष कर्नावत, सुमीता वाघ, ज्योती गांगुर्डे, हनी नारीनी उपस्थित होते. नागरिकांनी आवर्जून हे प्रदर्शन पाहावे, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
वॉरियर्स पोस्टर्सचे प्रदर्शन
विभाजन विभिषिका शोकांतिका स्मृती दिननिमित्ताने सिटी सेंटर मॉल येथे स्वातंत्र्य पूर्व फाळणी वेळचे प्रसंग आणि घटना दर्शविणारे छायाचित्र आणि माहिती प्रदर्शन भरवण्यात आले आहे. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याचप्रकारचे प्रदर्शन पिनॅकल मॉल येथेही भरवण्यात आले आहे. उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर यांच्या हस्ते पिनॅकल मॉल येथील छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.