कराची (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम राष्ट्रकुल २०२२ स्पर्धेचे सूप नुकतेच वाजले. या स्पर्धेमधून पाकिस्तानचे दोन बॉक्सर बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. सुलेमान बलूच आणि नजीरुल्लाह खान अशी या दोघांची नावे आहेत. राष्ट्रीय महासंघाने याबाबत माहिती दिली असून पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनचे सचिव नासेर तांग यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय.
“सुलेमान बलूच आणि नजीरुल्लाह खान यांचे पासपोर्ट आणि इतर प्रवासाची कागदपत्रे महासंघाच्या अधिकाऱ्यांकडे आहेत. संघ व्यवस्थापनाने यूकेमधील पाकिस्तान उच्चायुक्तांना आणि लंडनमधील संबंधित अधिकाऱ्यांना सुलेमान आणि नझिरुल्ला बेपत्ता झाल्याची माहिती दिली. बेपत्ता झालेल्या बॉक्सरची कागदपत्रे पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी मानक कार्यप्रणालीनुसार ठेवण्यात आली”, अशी माहिती नासेर तांग यांनी दिली.
पाकिस्तान ऑलिम्पिक संघाने बेपत्ता झालेल्या दोन बॉक्सरचा तपास करण्यासाठी चार सदस्यीय समितीची स्थापना केलीय. याआधी दोन महिन्यापूर्वी राष्ट्रीय जलतरणपटू फैझान अकबर हंगेरीतील फिनावर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बेपत्ता झाला.