Monday, June 16, 2025

शिंदे गट दादरमध्येच प्रतिसेनाभवन आणि प्रभागात स्वतंत्र शाखा उभारणार

शिंदे गट दादरमध्येच प्रतिसेनाभवन आणि प्रभागात स्वतंत्र शाखा उभारणार

मुंबई : मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दादरमध्ये शिंदे गटाचे मुख्य कार्यालय उभारण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: या कार्यालयातून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत. येत्या १५ दिवसांमध्ये या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.


शिंदे आणि ठाकरे वाद आता चांगलाच उफाळून आला असून दोघांच्या चुरशीची लढत सुरू आहे. या लढतीत आता शिंदे गटाने नवा डाव खेळला आहे. ठाकरे गटाला आव्हान देण्यासाठी आता शिंदे गट मुंबईत प्रति सेना भवन उभारणार आहे. दादरमध्येच हे नवे सेना भवन उभारले जाणार असल्याची माहिती सदा सरवणकर यांनी दिली. परंतु, याबाबत बोलताना सरवणकर यांनी हे प्रतिसेना भवन नसून ते मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली.


आज एक आभास निर्माण केला जात आहे की मुंबईवर ठाकरे गटाचे राज्य आहे. मात्र मुंबईतली जनता, शिवसैनिक उद्धव ठाकरेंवर नाराज आहेत. कारण ते मुख्यमंत्री असताना कोणतीही कामे झाली नाहीत. एकाही बेरोजगाराला नोकरी मिळाली नाही. यामुळे आता प्रत्येक प्रभागामध्ये वेगळे कार्यालय उभारण्यात येणार आहे.


सरवणकर पुढे म्हणाले की, आता लवकरच स्वतंत्र शाखा उभारल्या जातील, शाखाप्रमुखांची घोषणा होईल. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे काम जोरदार सुरू होईल. शिंदे साहेबांच्या कामाची गती पाहता त्यांना चांगल्या कार्यालयाची गरज आहे. त्यामुळे दादरमध्येच त्यांचे एक मुख्य कार्यालय असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली इतर शाखा काम करतील.


दरम्यान, शिंदे गटाच्या या मुख्य कार्यालयाचे नाव काय असणार याबाबत अध्याप माहिती मिळालेली नाही.

Comments
Add Comment