Wednesday, July 2, 2025

नवगावच्या खडकावर आदळले फिलिपाईन्सचे जहाज

नवगावच्या खडकावर आदळले फिलिपाईन्सचे जहाज

अलिबाग (वार्ताहर) : मुरुडच्या समुद्रात भरकटलेल्या गुजरातमधील जहाजाची घटना ताजी असतानाच अलिबाग तालुक्यातील नवगावच्या समुद्रातील खडकावर फिलीपाईन्सचे एम. एच. कोरिमा नावाचे जहाज आदळून झालेल्या अपघातात पाच कर्मचारी अडकले होते. त्यांची तटरक्षक दलाच्या चेतक या हेलिकॉप्टरने सुखरूप सुटका केली असून, त्यांना मुंबईला नेण्यात आले आहे.


अलिबाग शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शैलेंद्र सणस यांनी दिलेल्या माहितीनुसार, `एम. एच. कोरिमा’ नावाचे जहाज हे दुबई येथून मालदीवला निघाले होते; परंतु या जहाजामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने अलिबाग तालुक्यातील रेवस जेट्टीला ते जहाज सात ते आठ दिवसापासून होते. तेथे जहाजाची दुरुस्ती झाल्यानंतर गुरुवारी (ता.११) जहाज पुढच्या प्रवासाला निघाले होते. मात्र खराब हवामानामुळे या जहाजावरील कर्मचाऱ्यांनी भरसमुद्रात नांगर टाकला होता; परंतू जोरदार वाऱ्यामुळे हे जहाज हेलकावे खातखात अलिबाग तालुक्यातील नवगावच्या समुद्रकिनाऱ्यावरील खडकावर आदळले. परिणामी या जहाजाला भोक पडल्याने या जहाजामध्ये पाणी भरू लागले, तर दुसरीकडे जहाजातील बॅटरीच्या ठिकाणी आग लागल्याने जहाजावरील पाचही कर्मचारी गोंधळून गेले. त्यांनी सुरक्षिततेसाठी नेव्ही आणि तटरक्षक दलाला तातडीने मेसेज पाठविले. दुसरीकडे स्थानिक पोलिसांनी आरसीएफमधील सीआयएसएफचे हॅलिपॅड जहाजावरील कर्मचाऱ्यांना घेऊन येणाऱ्या चेतक हेलिकॉप्टरला वापरण्यासाठी परवानगी मागितली होती.


दरम्यान, जहाजावरील कर्मचाऱ्यांनी पाठविलेला मेसेज तटरक्षक दलाल मिळताच त्यांच्या चेतक हेलिकॉप्टरने जहाजावरील पाचजणांना वाचविले. या पाच जणांमध्ये एक भारतीय कॅप्टन पांडे, तीन फिलीपाईन्सचे नागरिक आणि एक व्हिनेगलच्या नागरिकाचा समावेश आहे. या सर्वांना मुंबई येथे नेण्यात आले. याकामी सीआयएसएफचे पथक, अलिबाग शहर पोलीस ठाणे, मांडवा पोलीस ठाणे आणि स्थानिक पोलिसांनी मदत केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >