
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आठव्यांदा शपथ घेण्याचा विक्रम नितीश कुमार यांनी केला असला तरी प्रत्येकवेळी कोणाच्या तरी पाठीत खंजीर खुपसूनच त्यांनी सत्ता काबीज केली आहे. समाजवादी विचारसरणीच्या नेत्याला हे शोभते काय, असा प्रश्न या देशातील पुरोगामी आणि स्वत:ला बुद्धिमंत म्हणवून घेणारे विचारत नाहीत, याचेच मोठे आश्चर्य वाटते. राष्ट्रीय पुरस्कार परत करणारी बुद्धिजीवी लाॅबी कुठे आहे, मॉब लिचिंगवरून आक्रोश करणारी मंडळी कुठे लपली आहेत, संसदीय लोकशाहीचा गळा घोटला जातोय म्हणून गळे काढणारे का गप्प बसले आहेत? सन २००० पासून ते आज तागायत स्वत:ला समाजवादी व धर्मनिरपेक्ष म्हणविणाऱ्या नितीश कुमार यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या पक्षांशी गद्दारी करून आणि त्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्रीपद काबीज केले आहे. देशातील नंबर १ संधीसाधू मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांची गणना केली जाईल. नितीश कुमार यांचा पक्ष बिहारमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. कालपर्यंत त्यांनी भाजपची साथ घेतली व आता राजद व काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी केली आहे. सत्तेच्या चाव्या मात्र त्यांनी आपल्या जवळच ठेवल्या आहेत. बिहारमध्ये राजकारणाचा चुथडा झाला आहे. १९८०-९०च्या दशकात तो लालूप्रसाद यादव यांनी केला आणि गेल्या वीस वर्षांत नितीश यांनी राजकारणाचा चिखल करून टाकला. स्वबळावर कधी नितीश यांना सत्ता मिळवता आली नाही. पण मुख्यमंत्रीपदाची हाव त्यांना सुटत नाही.
लालू यादव म्हणजे या देशातील भ्रष्टाचाराचा शिरोमणी. लालू म्हणून जंगल राज असे स्वत: नितीश कुमारच म्हणाले होते. लालू नको म्हणून भाजपने नितीश कुमार यांना जवळ केले, त्यांना गोंजारले, त्यांचे भरपूर लाड केले. वेळोवेळी त्यांना मुख्यमंत्रीपद दिले, केंद्रात त्यांना व त्यांच्या पक्षाला चांगले स्थान दिले. तरीही नितीश यांचा उलट्या काळजाचा स्वभाव कधी गेला नाही. ज्यांनी मदत केली, ज्यांनी मानसन्मान दिला, ज्यांच्यामुळे मुख्यमंत्रीपद मिळाले त्यांच्यावरच उलटणारा हा माणूस आहे. सत्ता कितीही मिळाली तरी त्याची हाव सुटत नाही हे यानिमित्ताने दिसून आले. बिहारमध्ये अनेक वर्षे मुख्यमंत्री राहिल्यामुळे त्यांना उपराष्ट्रपतीपदाची हाव होती व त्यासाठी त्यांची तळमळ होती असा गौप्यस्फोट बिहारमधील त्यांच्या सरकारमध्ये अनेक वर्षे उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेल्या सुशील मोदी यांनी केला तेव्हा मात्र नितीश भडकले. असे काहीही नाही, ते काहीही सांगत आहेत, असा त्यांनी खुलासा करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. जगदीप धनकड यांनी गुरुवारीच उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली, उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएमध्ये अनेक सक्षम व इच्छुक उमेदवार आहेत.
पण मोदी-शहा जे ठरवतील ते सर्वांना मान्य होते. नितीश यांना धनकड यांची उमेदवारी मान्य नव्हती, तर त्यांनी त्याच वेळी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी होती. पण राज्यात सत्ता टिकविण्यासाठी त्यांना भाजपची साथ हवी होती. काँग्रेस, राजद, डावे पक्ष यांना बरोबर घेऊन नितीश यांचे नवे महाआघाडी सरकार बिहारमध्ये स्थापन झाले आहे. भाजपला सोडून आपण सरकार स्थापन करू शकतो हे त्यांनी देशाला दाखवून दिले. पण ज्या भाजपची मदत घेऊन त्यांनी सत्ता मिळवली होती, त्या भाजपला ते आता शत्रू मानू लागले आहेत. जे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात केले तेच नितीश कुमार यांनी बिहारमध्ये केले. भाजपला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर अडीच वर्षे सत्ता उपभोगलेल्या ठाकरे यांचे काय झाले हे देशाने बघितले. उद्धव ठाकरे यांना ४० आमदारांच्या बंडानंतर कोणीही वाचवू शकले नाही. आता तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष शिवसेनेपासून अंतर राखून आहेत. नितीश यांना आज भाजपला धडा शिकविल्याचा आसुरी आनंद वाटत असेल, पण त्यांनीही भविष्यात केलेल्या गद्दारीची किंमत मोजावी लागणार आहे.
भविष्यात त्यांची अवस्था ठाकरे यांच्यासारखी झाल्यास आश्चर्य वाटायला नको. भाजपला सत्तेतून दूर हटवले म्हणजे आपण फार मोठा भीम पराक्रम केला असे नितीश कुमार यांना वाटत असावे. या पराक्रमाने सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव, अरविंद केजरीवाल, अगदी फारूख अब्दुल्ला आणि मेहबुबा अशा सर्वांना आनंद होणे स्वाभाविक आहे. पण सत्तेचे भागीदार बदलल्यावर नितीश यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या हल्ल्याचे टार्गेट बनवले हा प्रकार म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखे आहे. मी राहील किंवा न राहीन, पण २०१४ ला जे जिंकून आलेत, ते २०२४ला पंतप्रधान राहतील का? असा कुत्सित सवाल त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर केला आहे. बावीस वर्षांत आठ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या नितीश यांना बिहारचे मागासलेपण कमी करता आले नाही. देशभर पोटापाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या लक्षावधी बिहारींना आपल्या गृहराज्यात साधा रोजगार देता आला नाही, राज्यातील जाती-पातीचे राजकारण रोखता आले नाही. त्यांनी मोदींना आव्हान देणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. मोदींनी नितीश यांचा नेहमीच आदर केला, त्यांना सन्मानाने वागवले. पण नितीश यांनी त्याची परतफेड गद्दारीने केली, असेच म्हणावे लागेल. काँग्रेस, राजदबरोबरचा नवा घरोबा किती दिवस टिकतो हे आता बघायचे….