Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरसंकटांचे वादळ शमू दे, अर्नाळ्यातील कोळी बांधवांचे दर्याराजाला साकडे

संकटांचे वादळ शमू दे, अर्नाळ्यातील कोळी बांधवांचे दर्याराजाला साकडे

विरार (प्रतिनिधी) : ‘नैसर्गिक आपत्ती, मासेमारीला न मिळालेला हमीभाव, डिझेल परतावा आणि कर्ज परतपेढीची संकटे शमू दे; आणि कोळी बांधवांच्या जाळ्यात भरपूर मासळी मिळू दे!` असे साकडे अर्नाळ्यातील कोळी बांधवांनी दर्याराजाला घातले. नारळी पौर्णिमेनिमित्त येथील कोळी बूंध-भगिनींनी पारंपरिक पद्धतीने दर्याराजाची विधिवत पूजा केली. या प्रसंगी अर्नाळा आणि परिसरातील शेकडो रहिवाशी अर्नाळा किनारी जमले होते.

अर्नाळापासून वसई पाचूबंदर या १६ किमीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कोळी बांधवांची वस्ती आहे. येथील शेकडो बांधव आजही समुद्रातील मासेमारीवर उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे येथील नारळी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पारंपरिक पेहरावात येथील कोळी बांधव समुद्रकिनारी एकत्रित येऊन होडी आणि दर्याची पूजा करतात. त्यानंतर होणारा नृत्य, संगीत सोहळा पाहण्याकरता दूरदूरहून लोक येत असतात.

मागील दोन वर्षे कोरोनामुळे अन्य उत्सवांसह नारळी पौर्णिमेवरही निर्बंध आले होते. मात्र या वेळी या सणातील उत्साह आणि आनंद द्विगुणित झालेला पाहायला मिळाला. मात्र कोरोनामुळे कोळी बांधवांवर आलेले आर्थिक अरिष्ट आजही टळलेले नाही. बँकांचे कर्ज, डिझेल परतावा, मासळीला न मिळालेला हमीभाव, पर्सिसन मासेमारी इत्यादी संकटांशी येथील कोळी बांधव आजही झुंजत आहे. हे कमी की काय म्हणून नैसर्गिक संकटांनाही त्याला तोंड द्यावे लागत आहे. नुकत्याच आलेल्या वादळामुळे समुद्रात मासेमारीला गेलेल्या येथील शेकडो कोळी बांधवांना रिकामी हातीच परतावे लागले आहे. कोविड काळानंतर पहिल्यांदाच १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारी हंगामाकरता कोळी बांधव समुद्रात गेले होते. त्यामुळे किमान या वर्षी तरी भरपूर मासळी मिळेल, अशी अपेक्षा कोळी बांधवांना होती. या आशेवर पाणी फेरले गेले आहे.

या सगळ्या संकटांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी नारळी पौर्णिमेचा सण साजरा झाला. मात्र या येथील कोळी बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर या दु:खाचा लवलेशही नव्हता. किंबहुना दर्याराजाला हे संकट दूर कर, असे साकडे घालून या सणातील आनंद द्विगुणित करण्यासह सर्वांच्या भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली.

दरम्यान, अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ फोडी स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेत सहभागी होण्याकरता वसई आणि परिसरातून लोक आले होते. अर्नाळा, पाचूबंदर, नायगाव कोळीवाडा आणि खोचिवडे परिसरात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. या निमित्ताने महिनोनमहिने मासेमारीकरता समुद्रात असलेल्या कोळी बांधवांना परिवारात, कुटुंबांत एकत्र येण्याचा आनंद मिळत असतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -