लासलगाव (प्रतिनिधी) : कोविड -१९ मुळे गेल्या २ वर्षांपासून ‘कामायनी एक्सप्रेस’ चा (११०७२ अप – ११०७१ डाऊन) या गाडीचा थांबा लासलगाव व नांदगाव स्टेशनसाठी रद्द झाला होता. परंतु केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या माध्यमातून आणि प्रयत्नातून या गाडीचा थांबा रविवार दि. १४ ऑगस्ट २०२२ पासून या दोन्ही रेल्वे स्थानकांवर पूर्ववत होत असल्याची माहिती भाजपच्या महिला मोर्चा नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्षा सुवर्णा जगताप यांनी दिली.
कामायनी एक्सप्रेसच्या लासलगाव व नांदगाव रेल्वे स्टेशनवरील थांब्यामुळे सर्व रेल्वे प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, व्यापारी घटक या सर्वांचाच फायदा होणार असून या सर्वाना दिलासा मिळणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनाच्या पूर्वसंधेला हा निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे प्रवाशांनी अभिनंदन केले आहे. रविवार दि. १४ तारखेला संध्याकाळी ५.४० वाजता डॉ. भारती पवार कामायनी एक्सप्रेसला व्हीडिओ कॉन्फरंसिंगद्वारे झेंडा दाखवणार आहेत. सर्वांनी लासलगाव रेल्वे स्टेशन येथे उपस्थित रहावे, असे आवाहन सुवर्णा जगताप यांनी केले आहे.