Tuesday, June 24, 2025

भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाच्या निवडीत अनपेक्षित धक्का देणार!

भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाच्या निवडीत अनपेक्षित धक्का देणार!

मुंबई : तब्बल ४० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. त्यानंतर आता सर्वांना खातेवाटप आणि पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची उत्सुकता लागली आहे. मात्र, त्याचवेळी भाजप पक्षसंघटनेत अंतर्गत खांदेपालटाची प्रक्रिया सुरु आहे. मुंबई आणि महाराष्ट्र भाजपचे दोन्ही अध्यक्ष मंत्री झाल्याने याठिकाणी आता नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती होणार आहे. यामध्ये मुंबई प्रदेशाध्यक्षपदासाठी भाजप नेते आशिष शेलार यांचे नाव निश्चित मानले जात आहे. मात्र, भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची निवड करताना बावनकुळे आणि कुटे यांच्यात रस्सीखेच सुरु असली तरी भाजपकडून पुन्हा एकदा अनपेक्षित नावाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.


विदर्भातील नेते चंद्रशेखर बावनकुळे हे चंद्रकांत पाटील यांची संघटनेतील जागा घेतील, असे सांगितले जात होते. मात्र, आता या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील आमदार संजय कुटे यांचे नावही अचानक चर्चेत आले आहे. भाजपकडून लवकरच मुंबई आणि महाराष्ट्राचे नवे प्रदेशाध्यक्ष अधिकृतरित्या जाहीर केले जाणार आहेत. या शर्यतीत शेवटच्या क्षणी संजय कुटे यांची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीत बसणार का, हे पाहावे लागेल. आशिष शेलार यांच्याप्रमाणेच संजय कुटे हेदेखील देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या वर्तुळातील मानले जातात.


एकनाथ शिंदे गटाचे आमदार बंड करून सुरत आणि गुवाहाटीला गेल्यानंतर संजय कुटे हे त्यांची सर्व व्यवस्था पाहत होते. शिंदे गटाने शिवसेनेविरोधात पुकारलेल्या बंडानंतर भाजपकडून सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांच्याशी संजय कुटे यांनी संपर्क साधला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील असल्यामुळेच संजय कुटे यांच्यावर ही कामगिरी सोपवण्यात आली होती. त्यानंतर आता संजय कुटे हे थेट भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या ज्या नेत्यांना संधी देण्यात आली होती, त्या यादीवर देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यानंतर आता संजय कुटे हे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष झाल्यास मंत्रिमंडळापाठोपाठ भाजप संघटनेतील नियुक्त्याही देवेंद्र फडणवीस यांच्याच कलाने होत असल्याचे सिद्ध होईल.

Comments
Add Comment