विरार (प्रतिनिधी) : अर्नाळा समुद्रकिनाऱ्याला शुक्रवारी दुपारी पुन्हा एकदा उधाणाचा फटका बसला. जोरदार वारे आणि लाटांमुळे समुद्राचे पाणी किनाऱ्यावरील उद्यानात शिरल्याने या उद्यानातील अनेक झाडे उन्मळून व मोडून पडली आहेत. अचानक आलेल्या या उधाणामुळे पर्यटकांचीही तारांबळ उडाली होती.
पावसाळा सुरू झाल्यापासून अर्नाळा किनाऱ्याला सातत्याने उधाणाचा सामना करावा लागतो आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या उधाणानंतर शुक्रवारी या किनाऱ्याला पुन्हा एकदा मोठ्या उधाणाचा सामना करावा लागला आहे. जोरदार वारे आणि लाटांमुळे समुद्राचे पाणी थेट किनाऱ्यावरील उद्यानात शिरले. वाऱ्यामुळे नारळ आणि सुरूची काही झाडे मोडून पडली आहेत. अचानक झालेल्या या हवामान बदलामुळे पर्यटकांचीही त्रेधातिरपिट उडाली.
१ ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरू झालेला आहे. मात्र हवामान खात्याने समुद्रात वादळांची शक्यता वर्तवल्याने दोन दिवसांपूर्वीच मच्छीमार बांधव रिकामी हाती घरी परतले होते. वादळांची शक्यता आणखी काही दिवस असल्याने समुद्राला सातत्याने उधाण येत असल्याचे परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे.
जुलै महिन्यात आलेल्या उधाणावेळी किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या घरादारांत पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर आलेले हे दुसरे मोठे उधाण असल्याचे पसिरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा एकदा कोळी बांधवांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.