‘कॉस्ट ऑफ लिविंग’च्या क्रायसिसला उतारा

Share

वसुंधरा देवधर

स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे पूर्ण होताहेत. स्वातंत्र्य पूर्व काळात जन्मलेली पिढी हळूहळू अस्तंगत होत आहे. तीस वर्षांपूर्वी देशाची अर्थव्यवस्था खुली झाली, खासगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण या त्रयीने आपले पाय पसरायला सुरुवात केली. जगभरातील विविध उद्योग व्यवसायांना भारतीय बाजारपेठ खुणावू लागली. सुरुवातीचे अपूर्वाईचे, कौतुकाचे दिवस मागे पडले. खाऊजा काळात जन्मलेली पिढी हळूहळू कमावती झाली. ग्राहकाचा चेहरा-मोहरा आणि गरजा यात बदल झाला. खरेदीच्या प्राथमिकता आणि पद्धती बदलल्या. पण तरी मूलभूत गरजा कशा बदलणार? जगभर अन्न, वस्त्र, निवारा यांचे स्थान बदलणे शक्य नाही, हेही काळाच्या ओघात स्पष्ट झाले. अचानक आलेल्या कोरोना संकटाने ‘अत्यावश्यक काय’, हे सर्वांना उमजले.

जगभरातील विविध देश व्यापारानिमित्ताने जोडले गेले, परस्पर सहकार्य, समझोते आणि अवलंबित्व याचे एक अतिशय जटिल म्हणावे, असे जाळे तयार झाले. त्यात राष्ट्रीय स्वार्थ आणि अस्मिता यांची भर पडून गुंतागुंत अजूनच वाढत गेली. या सर्वच घटनाक्रमाचा आणि घटकांचा परिणाम म्हणजे जणू आजचा वर्तमान. जगभरात वाढलेली महागाई. अत्यावश्यक अशा अन्न पदार्थांचे वाढलेले भाव, टंचाई आणि त्यातून सामान्य ग्राहकांची होणारी ससेहोलपट! ‘कंझ्युमर्स इंटरनॅशनल’ने सुद्धा याची दखल ‘कॉस्ट ऑफ लिविंग क्रायसिस’ या शीर्षकांतर्गत घेतली आहे. विकसनशील नव्हे तर विकसित देशांमधील सामान्य ग्राहकाचे जगणे कठीण व्हावे, अशी ही महागाई आहे. क्रायसिस म्हणावे इतका हा प्रश्न ज्वलंत झाला आहे. त्यामुळे कुठे पगारवाढीसाठी आंदोलन चालू आहे, तर कुठे भाव खाली यावेत म्हणून मोर्चे निघत आहेत. भारतीय बाजारपेठेचा अभ्यास करणाऱ्या ‘नेल्सन आय क्यू’ कंपनीने सादर केलेल्या आकडेवारीच्या सहाय्याने ही महागाई वेगळ्या प्रकारे स्पष्ट होऊ शकेल.

जूनपर्यंत संपलेल्या सहा महिन्यांत अन्नविषयक उलाढालीचा आढावा घेतल्यावर, असे लक्षात येते की, ग्राहकांनी आधीच्या सहामाहीपेक्षा जास्त पैसे मोजलेले दिसतात, मात्र त्या बदल्यात त्यांच्या हातात तुलनेने कमी माल मिळाला. ढोबळ उदाहरणाने सांगायचे झाल्यास १० किलोच्या जागी साडेनऊ किलो माल घेतला आणि त्यासाठी पूर्वीच्या १०० रुपयांऐवजी १०५/ १०७ रुपये मोजावे लागले. हे उदाहरण केवळ संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आहे. किंमत तीच ठेवून पाकिटातील बिस्किटे कमी केल्याचा अनुभव अनेक जणांनी घेतला असेलच. सामान्य ग्राहकांकडे गरजेच्या खरेदीव्यतिरिक्त काही खरेदीसाठी कमी पैसे शिल्लक उरताहेत. मात्र जे उरतेय ते क्षणिक आनंद देणाऱ्या खाद्यपदार्थ आणि पेयांच्या खरेदीमध्ये संपून जातेय. पण जर मूलभूत गरज भागत नसेल, त्यावेळी साहजिकच पर्यावरण, छोट्या-मोठ्या आरोग्यविषयक समस्या, पुस्तक खरेदी असे विषय मागे पडतात. आजचा दिवस साजरा झाला की बास. उद्याचे उद्या, अशी मनोधारणा होऊ शकते. त्यात ज्यावेळी सणवार येतात, त्यावेळी मोठा मानसिक व आर्थिक ताण येतो. मग सामान्य ग्राहक म्हणून आपण काय करू शकतो?

१. सण साजरे करण्याच्या बाजारचलित कल्पनांना पूर्णपणे फाटा देणे.

याचा अर्थ असा की, विविध सणांच्या निमित्त खास म्हणून काही उत्पादने बाजारात ओतली जातात. कपडे आणि त्यांना साजेशा इतर वस्तू एकत्रित सेट म्हणून विकायला येतात. प्रत्येक सणाला नव्याने कपडे खरेदी झाली पाहिजे, असे जाहिरातीद्वारे ग्राहकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न सतत होतो. त्याला ग्राहकांनी बळी पडता कामा नये.

२. सणानिमित्त लागलेल्या सेलकडे आणि ऑफर्सकडे पाठ फिरवणे.

३. बाहेरून खाद्यपदार्थ खरेदी करणे किंवा जेवायला बाहेर जाणे,

म्हणजे सण साजरा करणे या कल्पनेपासून दूर होणे. तोंड गोड करण्यासाठी गुळाचा खडा सुद्धा चालू शकतो. आपला गणपती बाप्पा, तर केवळ गूळ-खोबऱ्यावर प्रसन्न असतो, हे लक्षात घ्यायला हवे. म्हणून जाहिरातचलित खाऊ आणि मिठाई घेण्यावर मनाचा ब्रेक लावणे आवश्यक ठरते. अनेक वेळा पॅकिंगचा डोंगर पोखरून खाऊचा इवलासा तुकडा बाहेर पडतो, तर कधी हातात जेमतेम धरता येईल, असे खेळणे. त्यापेक्षा सर्वांनी ठरवून भातुकलीसारखा एक एक पदार्थ केला तरी आरोग्यपूर्ण आणि पोटभर खाणं होतं.

४. भेटवस्तू महागडी असली पाहिजे, या विचारास थारा न देणे.

५. भेटवस्तू दिलीच पाहिजे / मिळालीच पाहिजे, असा आग्रह सोडून देणे.

या पंचसूत्रीची नोंद करायला निमित्त झाले ते कॉस्ट ऑफ लिविंग पराकोटीची वाढल्याचे! पण सर्वच ग्राहकांनी तिचा अवलंब केला, आपल्या गरजा आणि जीवनशैलीमध्ये या पंचसूत्रीचा अंतर्भाव केला, तर संकटात संधी मिळावी, त्याप्रमाणे आर्थिक गणिते सुकर होऊ शकतील. शिवाय सध्या आपण पारंपरिक सणांबरोबर, इतर अनेक दिवस साजरे करतो. वाढदिवसाचा उत्सव करतो आणि जरा काही झालं की जमेल तशी पार्टी करतो. त्याला आळा घालणे शक्य आहे. यावेळी सामान्य जनता क्रायसिसमधून जात असताना ज्यांना शक्य आहे ते सगळे आपल्यातला एक अमृताचा घास गरजू व्यक्तीला देऊ शकले, तर स्वतंत्र भारताचे जागरूक नागरिक आणि सुजाण ग्राहक ठरतील. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने सुफळ आणि सफल होईल.

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

3 hours ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

4 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

4 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

5 hours ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

6 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

6 hours ago