Tuesday, July 23, 2024
Homeमहामुंबईमरीन ड्राईव्ह परिसरातील इमारतींवरील रोषणाईकरिता मिळाला ५० टक्के निधी

मरीन ड्राईव्ह परिसरातील इमारतींवरील रोषणाईकरिता मिळाला ५० टक्के निधी

‘घरोघरी तिरंगा’ अभियान

मुंबई (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उद्या शनिवारपासून १५ ऑगस्टपर्यंत मुंबईत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविले जाणार आहे. या निमित्त मुंबईची जागतिक ओळख असलेल्या आणि राणीचा कंठहार (क्वीन्स नेकलेस) म्हणून नावाजलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरात एकूण २८ निवासी इमारतींवर पालिकेच्या वतीने विद्युत रोषणाई केली जाणार आहे. त्यासाठी होणाऱ्या खर्चापैकी सुमारे ५० टक्के निधी कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वातून प्राप्त झाला आहे. पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांची पालिका मुख्यालयात भेट घेऊन धनादेश दात्यांनी सुपूर्द केले. यावेळी अतिरिक्त पालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा आणि उप आयुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव हे देखील उपस्थित होते.

घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा अभियान मुंबई महानगरात सर्वत्र राबविले जाणार आहे. या निमित्त मरीन ड्राईव्ह परिसरात तिरंगा स्वरुपातील विद्युत रोषणाई विशेष आकर्षणाचा भाग असेल. मरीन ड्राईव्ह येथील एकूण २८ निवासी स्वरुपाच्या इमारतींवर पालिकेच्या वतीने विद्युत रोषणाई केली जाणार आहे. तर, इतर व्यावसायिक इमारतींवर संबंधितांनी विद्युत रोषणाई करण्याचे आवाहन पालिकेने यापूर्वीच केले आहे.

मरीन ड्राईव्ह येथील २८ निवासी इमारतींवर तिरंगा विद्युत रोशणाईसाठी अंदाजे सुमारे ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आयनॉक्स समुहाचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ जैन, पार्कसन्स पॅकेजिंग लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ केजरीवाल आणि ज्युपिटर डायकेमचे व्यवस्थापकीय संचालक निमेश चोखाणी यांनी आपापल्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तर दायित्वातून प्रत्येकी ८ लाख रुपये असा एकूण २४ लाख रुपयांचा निधी धनादेश स्वरुपात पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्याकडे पालिका मुख्यालयात शुक्रवारी सुपूर्द केला आहे. म्हणजेच मरीन ड्राईव्ह येथील निवासी इमारतींवरील विद्युत रोषणाईचा निम्मा खर्च या तीन कंपन्यांनी उचलला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -