मुंबई (प्रतिनिधी) : कोविड जनुकीय सूत्र निर्धारण चाचणीच्या चौदाव्या फेरीदरम्यान करण्यात आलेल्या निष्कर्षानुसार मुंबईत १०० टक्के नमुने ओमायक्रॉनने बाधित असल्याचे समोर आले आहे. यामुळे मुंबई पालिकेची चिंता वाढली असून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पालिकेने मुंबईकरांना केले आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईत कोरोना रुग्णांच्या विषाणूची जनुकीय सूत्र चाचणी केली होती. या चाचणीत २३० नमुने घेण्यात आले होते. या २३० नमुन्यांपैकी सर्वच २३० नमुने ओमायक्रॉनने बाधित असल्याचे चाचणीतून समोर आले आहे. दरम्यान २३० नमुन्यांपैकी २८ टक्के अर्थात ६४ नमुने हे बीए २.७४ व्हेरिएंटचे आहेत. तर २० टक्के अर्थात ४५ नमुने हे बीए २.७५ व्हेरिएंटचे आहेत. आणखी २० टक्के म्हणजेच ४५ नमुने हे बीए २.७६ व्हेरिएंटचे आहेत. तर १२ टक्के अर्थात २८ नमुने हे बीए २.३८ व्हेरिएंटचे आहेत, ८ टक्के म्हणजेच १९ नमुने हे बीए ५ व्हेरिएंटचे आहेत. तर ७ टक्के अर्थात १८ नमुने हे इतर व्हेरिएंटचे आहेत. ४ टक्के म्हणजेच ९ नमुने हे बीए २.३८.१ व्हेरिएंटचे आहेत. १ टक्का अर्थात २ नमुने हे बीए ४ व्हेरिएंटचे आहेत.
तर या रुग्णांचे वयोगटानुसार विश्लेषण केले असल्यास २३० रुग्णांपैकी ० ते २० वर्षे – २६ (११ टक्के), २१ ते ४० वर्षे – ६८ (३० टक्के), ४१ ते ६० वर्षे – ६० (२६ टक्के), ६१ ते ८० वर्षे – ५९ (२६ टक्के), ८१ ते १०० वर्षे – १७ (७ टक्के) होते. या चाचण्या करण्यात आलेल्या २३० नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील २० नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, ५ नमुने हे ० ते ५ वर्षे या वयोगटातील, ५ नमुने ६ ते १२ वर्षे या वयोगटातील; तर १० नमुने १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते. तथापि, या रुग्णांमध्ये कोविड बाधेची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत. २३० चाचण्यांमध्ये ७४ जणांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती.