मुंबई : राज्यात सात ऑगस्टपासून पावसाची संततधार सुरूच असून कोसळणाऱ्या सततच्या पावसामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आणि विदर्भात पुरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळित झाले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. सातारा, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाने दणका दिला आहे. तर मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे.
नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा रद्द
पुरपस्थितीमुळे नागपूरमध्ये आज होणाऱ्या विद्यापिठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विदर्भात पावसाची दमदार हजेरी
विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तीन दिवसांपासून सर्वदूर विदर्भात धुव्वाधार पाऊस सुरू आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूरस्थितीत कायम असून, त्यात अधिकची भर पडली आहे. शेकडो गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. शेत-शिवारात पाणी साचल्याने लाखो हेक्टरातील पिके पाण्याखाली गेली आहेत. तीन दिवसात विदर्भात तब्बल १९ जण पुरात वाहून गेले आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना बोटीच्या मदतीने सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट कायम आहे.
धरणे भरली तुडूंब
घाटमाथ्यावर पावसाची मुसळधार सुरूच आहे. धरणांच्या पाणलोटात सुरू असलेल्या पावसाने पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सातारा, रायगड, पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहिला. सातारा जिल्ह्यात पाऊसाचा जोर कायम असून सर्व धरणे ओवरफ्लो झाली आहेत. तर कोयना धरणातूनही विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.