मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘वर्षा’ बंगल्यावर राहायला जाणार का? असा प्रश्न विचारला जात होता. परंतु आता मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर वास्तव्यासाठी न जाण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे ‘वर्षा’मधील मुख्यमंत्री कार्यालयाचा वापर बैठकांसाठी करणार आहे. त्यामुळे नंदनवन हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असेल.
महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २२ जून रोजी ‘वर्षा’ निवासस्थान सोडले होते. तेव्हापासून हा बंगला रिकामाच होता. अखेर सहा दिवसांपूर्वी वर्षा निवासस्थानाला एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी लावण्यात आली. तसेच ‘वर्षा’ बंगल्याची रंगरंगोटीही पूर्ण झाली. राज्यात सत्तांतर होऊन एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी शपथ घेतली. प्रथा आणि नियमाप्रमाणे मुख्यमंत्र्यांचे वास्तव्य हे वर्षा बंगल्यावर असते. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर महिना उलटला तरी एकनाथ शिंदे ‘नंदनवन’ बंगल्यावर वास्तव्यास आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २०१४ पासून मलबार इथल्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानातून आपला कारभार चालवत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे मंगळवारी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. इथे त्यांनी कार्यलयाची पाहणी केली. त्यानंतर छोटेखानी पूजाही पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर वास्तव्य न करण्याचा निर्णय घेतला. ते सध्या वास्तव्य करत असलेल्या ‘नंदनवन’ इथेच त्यांचा मुक्काम असेल. तर मुख्यमंत्री वर्षा, मंत्रालय आणि सह्याद्री अतिथीगृहावर रोजच्या बैठका घेणार आहेत.