प्रवीण दरेकरांचे शरद पवारांना प्रत्युत्तर
मुंबई : प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यापद्धतीने भाजपने बिहारमध्ये युती केली असेल, ते करत करताना समोरच्या मित्रपक्षाने आपला पक्ष टिकवणे, त्याला वाढवणे ही जबाबदारी त्यांची आहे. कोण कोणाला संपवत नसतो. आता असे म्हणायचे का की, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला संपवून टाकले, असे प्रत्युत्तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर दिले आहे.
ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला सत्तेमध्ये घेतले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. त्यानंतर आज शिवसेनेची काय अवस्था झाली आहे. मग असे सांगायचे का की, शरद पवारांनीच शिवसेनेला सोबत घेतले अन् त्यांची विल्हेवाट लावली.
सरकारमध्ये असताना शिवसेनेचे ४० आमदार दुसऱ्या पक्षात जातात याचा अर्थ काय? प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पक्ष वाढवत असताना इतर पक्ष कमी होत असतो. कोण कोणाला संपवत नसतो जो तो आपल्या कामाने पुढे जात असतो, असेही दरेकर म्हणाले.
हे पण वाचा : भाजप मित्रपक्षाला हळूहळू संपवतो, शिवसेना आणि जेडीयूकडे बोट दाखवत शरद पवारांचा हल्लाबोल
पुढे दरेकर म्हणाले की, शिवसेनेने आम्हाला दगा दिला म्हणून आम्ही शिवसेना फोडली, असे विधान भाजप नेते सुशील मोदी यांनी केले होते. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, ज्यावेळी शिवसेना आपल्या मुळ विचारांपासून लांब जात आहे, असे शिवसेनेच्या कडवट नेत्यांना वाटले म्हणून त्यांनी उठाव केला. हिंदूत्ववादी भूमिकेवर आम्ही निवडणूका लढलो होतो.
शिवसेना ही शिंदे यांची असून, ते भाजपात आलेले नाहीत. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा. मूळ शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची असून, ती टिकली पाहिजे ही भाजपची विचारधारा आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेने आपल्या विचारांवर पक्के राहावे. हिंदूत्ववादी भूमिकेवर आम्ही भविष्यात युती करू, असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला.