मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या अनेक भागात पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक नदी नाल्यांना पूर आले आहे. मुंबईसह परिसरात देखील जोरदार पाऊस कोसळत असून राज्यातील काही जिल्ह्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. त्याचबरोबर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, येत्या २४ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणास आज रेड अलर्ट जारी केला असून या भागात अतिवृष्टी तसेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १२ ऑगस्टनंतर पावसाची उघडीप होईल, असा अंदाज आहे. रविवारपासून महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार वृष्टी होत असून आगामी काही दिवस तशीच परिस्थिती राहील, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
राज्यात पुढचे दोन ते तीन दिवस पाऊसाचा जोर कायम राहणार आहे. यामध्ये पालघर, दक्षिण कोकण, पुणे आणि पूर्व विदर्भात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई ठाणे, मध्य महाराष्ट्र व विदर्भ काही भाग ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तर सांगलीतही कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.