नवी दिल्ली : काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. प्रियांका गांधी यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या घरीच क्वॉरंटाईन होणार आहेत. तसेच, त्या क्वॉरंटाईनच्या सर्व नियमांचे पालन करणार आहेत.
प्रियांका गांधींना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी जूनमध्ये प्रियांका गांधी आणि सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाली होती.
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रियांका गांधी यांनी स्वतः ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “आज कोविड चाचणी (पुन्हा) पॉझिटिव्ह आली. होम आयसोलेशनमध्ये राहणार असून सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन करीन.”
प्रियांका गांधी यांना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी ३ जून रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांची आई आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
महागाई आणि जीएसटी विरोधात काँग्रेसने काही दिवसांपूर्वी देशभरात आंदोलन केले होते. यावेळी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांनी संसदेतून मोर्चा काढला. पोलिसांनी सर्व खासदारांना विजय चौकात ताब्यात घेतले होते. काँग्रेस कार्यालयापासून प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. प्रियांका गांधी रस्त्यावरच धरणे धरून बसल्या होत्या. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.