नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर १२ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण आता पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी तब्बल दहा दिवसांनी लांबणीवर पडली असून पुढील सुनावणी २२ ऑगस्टला होणार आहे.
मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. उद्धव ठाकरे गटाने बंडखोर आमदारांना अपात्र ठरण्याबाबत आणि विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीबाबतच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. पण यावर सुनावणी होण्यास मुहूर्त लागत नाही. याआधी ८ ऑगस्टला यावर सुनावणी होणार होती. पण ऐनवेळी ही सुनावणी लांबणीवर पडून १२ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. यांच्याच घटनापीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. त्यांच्याकडे केवळ चारच दिवस बाकी आहेत. त्यामुळे ही सुनावणी पुन्हा वेगळ्या घटनापीठाकडे वर्ग होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश रमणा यांनी आतापर्यंत घटना आणि कायद्यांवर बोट ठेवून कडक निरीक्षणे नोंदवली होती.