पाटणा : बिहारमध्ये मित्र पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडने (जेडीयू) भाजपची साथ सोडून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षासोबत सरकार स्थापन केले आहे. आज नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राजद नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
नितीश कुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली. नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडताना भाजपवर जेडीयूचा अपमान करत स्वत:च्या विरोधात कट रचल्याचा आरोप केला होता.
२०१७ मध्ये “काहीही झालं तरी राजदसोबत जाणार नाही” म्हणणारे नितीश कुमार आज त्यांच्याच पाठिंब्यावर पुन्हा मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जाहीर आव्हान दिले. “निवडणूक काळात त्यांचं (भाजपा) वागणं योग्य नव्हतं. आमच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. पण त्यांच्याकडून जदयूला हरवण्यासाठीच प्रयत्न केले गेले. मी आमच्या पक्षातील सर्वांशी चर्चा केली. सगळ्यांच्याच मनात या आघाडीत राहायला नको हीच भावना होती. म्हणून भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला”, असे नितीश कुमार म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना नितीश कुमार यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी आदर व्यक्त केला. “अटल बिहारी वाजपेयींकडे आम्ही सगळे गेलो होतो. ते आम्हाला फार मानत होते. आम्ही ते कधीही विसरू शकत नाही. वाजपेयी आणि इतरांनी दिलेलं प्रेम आम्ही विसरू शकत नाही”, असे नितीश कुमार यांनी नमूद केले.