Tuesday, July 23, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यअविवाहित महिलांच्या एकटेपणातून निर्माण होणारे मानसिक आजार

अविवाहित महिलांच्या एकटेपणातून निर्माण होणारे मानसिक आजार

मीनाक्षी जगदाळे

आपल्या विविध लेखांमार्फत आपण समाजातील अनेक समस्या, विविध प्रवृत्ती, वेगवेगळे स्वभाव आणि मानसिकता असलेले व्यक्तिमत्त्व यावर लिखाण करीत असतो. मागील लेखात आपण घटस्फोटित आणि विधवा महिलांच्या समस्यावर चर्चा केली. आपल्या समाजात अविवाहित महिलांचे प्रमाण देखील बऱ्यापैकी आहे. स्वखुशीने अविवाहित राहिलेल्या अथवा परिस्थितीमुळे, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे, अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव विवाह होऊ न शकलेल्या महिलांना अनेक मानसिक समस्या भेडसावत असल्याचे दिसते. त्यांच्या सातत्याने बदलणाऱ्या मनोवृत्ती, सतत बदलणारे मूड, होणारी चिडचिड, नकारात्मक दृष्टिकोन, कुटुंबाकडून अवास्तव अपेक्षा, विचित्र वागणूक, विकृती यावर लिखाण करण्यासाठी अनेकांनी अनेक सत्य कथा सांगून त्यावर लिखाण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

काही कारणास्तव ऐका निराधार महिला आश्रमात जाण्याचा योग आला. अनिता (काल्पनिक नाव) एमएससी झालेली चाळीस वर्षीय तरुणी मनोरुग्ण अवस्थेत तिथे वास्तव्यास होती. अधिक माहिती घेतली असता समजले की तिचं ऐका व्यक्तीसोबत अनेक वर्षं प्रेमप्रकरण होते, दोघेही एकाच कार्यालयात कामाला होते. दोघेही लग्न करणार असं ठरले होते; परंतु सदर व्यक्ती अनिताला मध्येच सोडून दुसऱ्या राज्यात नोकरीचे कारण सांगून निघून गेला. तो कधीही परत न येण्यासाठी. प्रेम सफल होऊन, लग्न करणे हे स्वप्न पूर्णतः भंगल्याने आणि आता या वयात कोणाशीच लग्न होणार नाही, आयुष्य एकटे कसे काढायचे या विचारांनी अनिताच आयुष्यच बदलून टाकले. अनिताने या गोष्टीचा इतका जबरदस्त धक्का घेतला की, तिची मानसिकता खराब होऊन ती आज मनोरुग्ण बनून जगते आहे.

अंजली (काल्पनिक नाव) हिचा विवाहित भाऊ हिची सातत्याने बिघडत असलेली मानसिकता, होणारी चिडचिड आणि नकारात्मक स्वभाव यावर काय उपाय करता येईल यासाठी भेटायला आला होता. त्याच्या सांगण्यानुसार अंजलीला हा एक भाऊ आणि दोन विवाहित बहिणी आहेत. अंजलीला लहानपणापासून एकत्र कुटुंबातील जबाबदाऱ्यांमुळे लग्नच करता आले नव्हते. दोन्ही बहिणी, भाऊ यांची लग्न आई-वडिलांनी व्यवस्थित लावून दिली; परंतु अंजलीला मात्र अविवाहित राहावं लागलं. आज अंजलीने पन्नाशी पार केली आहे. तिच्या भावाच्या सांगण्यानुसार अंजली छोटीशी नोकरी करते, स्वतःचे पैसे कामावते; परंतु भाऊ, भावजय, भाचा यांच्याशी तिचे अजिबात पटत नाही.

एकटीच बिनलग्नाची बहीण म्हणून भावाच्याच घरात ती राहते आहे. भाऊ तिला सांभाळून घेतोय, भावाची पत्नी आणि मुलगा देखील तिचा सहानुभूतीपूर्वक विचार करत आहेत. तरी अंजली सातत्याने त्यांना आपण सगळ्यांसाठी कसा, किती त्याग केला, कुटुंबाने तिचा कसा आर्थिक गैरफायदा घेतला, कुटुंबातील प्रत्येकाने कसा स्वार्थ साधला, अंजली कशी कायमच अन्याय, अत्याचार सहन करत आली, यावर भाष्य करत असते. भाऊ-भावजय कुठे फिरायला गेले, खरेदी केली, हॉटेलिंग केली की अंजलीचा प्रचंड संताप होतो. मी कशी पूर्ण आयुष्य गरिबीत, काटकसर करून काढते आहे, मी स्वतःची कोणतीही हौसमौज करीत नाही, हे सगळेच मजा मारतात, पैसे उडवतात अशी तिची मानसिकता झालेली आहे. अंजली सातत्याने एकत्रित कुटुंबामुळे तीची स्वप्न कशी धुळीला मिळाली, तिला भावासाठी त्याला लहानाचे मोठे करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले हे भावजयीला ऐकवत राहाते. आजही जणू भावाच्या बायको-मुलाचं त्याच्यावर प्रेमच नाही, मीच भावावर खूप प्रेम करते हा अविर्भाव अंजलीचा असतो. भावाबद्दल प्रचंड भावनिक बोलून, त्याच्यावरील स्वतःच्या प्रेमाच्या, त्यागाच्या कहाण्या सांगून अंजलीने भावाच्या आयुष्यातील पत्नीचे स्थानच धुडकवून देण्याचा सपाटा लावला आहे. माझा भाऊ, माझा हक्क, माझा त्यावरील अधिकार, मी भावासाठी खाल्लेल्या खस्ता याचे सतत वर्णन करून भाऊ मात्र माझ्यासाठी काहीच करत नाही हे सांगून अंजली दिवसेंदिवस अस्वस्थ होताना दिसते आहे.

स्वतःचा वेगळेपणा, मोठेपणा सातत्याने सिद्ध करण्यासाठी अंजली तिच्या भावजयीला कोणत्याही कारणास्तव टोमणे मारणे, वारंवार तिच्या चुका काढणे, सातत्याने भावजयीला रंग, रूप, गुण, सवयी, दिसणे, राहणे यावरून हिणवते, कधीही तीचे कौतुक न करणे, कायमच तिला कमी लेखणे या प्रकारे वागत असते. अंजलीच्या सल्ल्यांचा, सतत मानसिक त्रास देण्याचा, एकतर्फी बोलण्याचा भडिमार आता भावजयीला नकोसा झाला आहे. त्यातून भाऊ त्याची बायको अथवा मुलगा एक शब्द जरी अंजलीला उलट बोलले की, ती सर्व इतिहास उगाळून काढणे, प्रचंड रडणे, त्यांच्याशी अबोला धरणे यासारखे प्रकार करत असते. अंजलीच्या भावाने यासाठी तिला विविध अध्यात्मिक उपक्रमात स्वतःला गुंतवायला सांगितले, तिला हिंडायला फिरायला नेणे, तिलादेखील गिफ्ट देणे, तिच्यासाठी खर्च करणे सर्व प्रयत्न केले. पण अंजलीचा स्वभाव काही बदलत नाहीये.

अशा प्रकारची अनेक उदाहरणे समाजात असून अविवाहित महिला या कुटुंबासाठी एक आव्हानच असल्याचे जाणवते. प्रचंड बिथरलेली मानसिकता, सातत्याने मूडमध्ये होणारे बदल, आपल्या अविवाहित राहण्याला इतरांना दोष देत राहणे, इतरांचे प्रापंचिक आयुष्य ढवळून काढणे, बलिदान, त्याग, कष्ट या शब्दांचा वारंवार वापर करून दुसऱ्याला अपराधी वाटायला प्रवृत्त करणे यामुळे त्या स्वतःही नीट आयुष्य जगत नाहीत आणि इतरांनाही जगू देत नाहीत.

मीना (काल्पनिक नाव) हीदेखील भाऊ आणि त्याच्या पत्नीसोबत राहणारी अविवाहित बहीण. मीना आज पंचेचाळीस वर्षांची असून ती सातत्याने भावाच्या बायकोला असे पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की नवरा बायकोमध्ये शारीरिक संबंधाला काहीही महत्त्व नाही. तुम्हाला एक मुलं झाले आता काय आवश्यकता तुला शारीरिक सुखाची? महिलांनी तिशी पार केल्यावर त्यांना सेक्सची गरज राहत नाही, तिशीनंतर इतर जबाबदाऱ्या बायकोने घ्याव्या. नवऱ्याला कामात, घरात कुटुंब चालवण्यात मदत करावी. अंजलीच्या सेक्सबद्दल आणि पती-पत्नीच्या शारीरिक संबंधबद्दल असलेले असले अचाट विचार आणि अपेक्षा पाहून तिची भावजय प्रचंड वैतागून गेलेली होती आणि समुपदेशनासाठी आली होती. स्वतःच्या शारीरिक गरजा, अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे, स्वतः आयुष्यभर अविवाहित राहिल्यामुळे ज्या सुखाला ती मुकली आहे तेच आयुष्य भावजयीने पण नवरा असूनसुद्धा जगावे ही मीनाची अपेक्षा. का? कशासाठी? स्वतःला नवऱ्याचा अनुभव नसताना, वैवाहिक जीवनाचा अनुभव नसताना नणंद सतत आपल्याला असले फालतू सल्ले का देते आणि त्यामुळे आपल्याला किती त्रास होतोय, हे मीनाची भावजय अतिशय आगतिक होऊन सांगत होती. अतिशय खोल, विस्तृत असा
अविवाहित महिलांच्या मानसिक समस्या हा विषय असून पुढील लेखातसुद्धा आपण यावर चर्चा करणार आहोत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -