ठाणे (प्रतिनिधी) : अभिनव व प्रयोगशील शिक्षणाच्या माध्यमातून रस्त्यावरील मुलांना दर्जात्मक शिक्षण देत असलेल्या सिग्नल शाळेतील रोबेटिक लॅबमध्ये रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुलांनी खास एलईडी राख्या बनवल्या. शाळेतील आपल्या सहअध्यायी भावा-बहिणींनी बनवलेल्या या राख्या बांधून बुधवारी तंत्रज्ञानाने परिपूर्ण असा रक्षाबंधन सण सिग्नल शाळेत साजरा करण्यात आला.
साध्या सुती दोऱ्यापासून तर कार्टुन व विविध तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या राख्या बाजारपेठेत एकीकडे उपलब्ध असताना सिग्नल शाळेच्या मुलांनी आपल्या रोबेटिक लॅबच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून आपल्या सहअध्यायी भावा बहिणींसाठी खास एलईडी राखी बनवत प्रतिकूलतेच्या लढाईत एकमेकांना संरक्षणाची हमी दिली. विविध सिग्नलवर निर्वासित मुलांसाठी आठ वर्षांपूर्वी समर्थ भारत व्यासपीठ व ठाणे महागरपालिका शिक्षण विभाग यांनी ठाण्याच्या तीन हात नाका येथे सिग्नल शाळा सुरू केली. मुख्य धारेच्या शिक्षणासोबत कला, क्रीडा, संगणक, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आधुनिक व प्रयोगशील शिक्षण मिळावे म्हणून शाळेत संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा व रोबेटिक लॅब सुरू केली. नुकत्याच पुणे येथे राष्ट्रीय स्तरावरील रोबेटिक स्पर्धेला देखील सिग्नल शाळेच्या मुलांनी आपला रोबो स्पर्धेत उतरवला होता.
सीडबी बँकेच्या सहकार्याने आत्ताच रोबेटिक लॅब अध्ययावत करण्यात आली असून तेथे चिल्ड्रन टेक सेंटरच्या माध्यमातून निष्णात प्रशिक्षक देखील नियुक्त करण्यात आहेत. या शिक्षकांच्या मदतीने मुले रोबोटिकचे शिक्षण घेत आहेत. रक्षाबंधनच्या निमित्ताने दीड व्हॉल्टचा बटन सेल व एलइडी बल्बचा वापर करत मुलांनी सुंदर राख्या साकारल्या व याच राख्या एकमेकांना बांधून सिग्नल शाळेतील रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. सण उत्सवांतील पवित्रपणा जपत त्यातून जिज्ञासा वाढीस लागावी यासाठी सिग्नल शाळा नेहमीच प्रयत्नशील असते, असे यावेळी समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कार्ले यांनी सांगितले.